पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 12:22 PM2019-06-06T12:22:45+5:302019-06-06T12:31:58+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे.
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. भोसरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असल्याचे समजते. यात मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीने सर्व ताकद पणाला लावूनही पार्थ पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे झालेल्या परभवाच्या कारणांची चर्चा आणि आगामी विधानसभेची तयारी अशा दुहेरी कारणाने बैठक बोलावण्यात आली आहे. शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ अमोल कोल्हेदेखील या बैठकीला हजर असून त्यांचा सुरुवातीला सत्कार केला जाणार आहे. या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे यांच्यासह मुख्य पदाधिकारी उपस्थित आहेत.
सध्या मावळ आणि शिरूरमधील विधानसभांमध्ये राष्ट्रवादीची स्थिती फारशी बरी नाही. आगामी निवडणुकीत किमान जागा जरी परत मिळवायच्या असतील तरी पक्षाला कंबर कसावी लागणार आहे. हेच लक्षात घेत पवार यांनी स्वतः लक्ष घालत एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये गतवैभव परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.