राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन अयशस्वी
By admin | Published: November 16, 2015 01:55 AM2015-11-16T01:55:59+5:302015-11-16T01:55:59+5:30
माळेगाव कारखान्याच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १५) आंदोलन करण्यात आले.
माळेगाव : माळेगाव कारखान्याच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १५) आंदोलन करण्यात आले. मात्र, सभासदांच्या अल्प प्रतिसादामुळे हे आंदोलन अपयशी ठरले.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने माळेगाव कारखाना बचाव शेतकरी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून कारखाना परिसरातील कामगार पुतळा चौकात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विद्यमान संचालकांवर आरोप करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केले जाणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.
कारखाना प्रशासनाच्या कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. शासन नियमाप्रमाणे एफआरपीची किंंमत एकरकमी मिळावी, कांडे वेचणी
बिल त्वरित मिळावे, सभासदांना दिलेल्या एकरी ३००० रुपयांचे अॅडव्हान्स बिलाचे रूपांतर अनुदानात करावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी उपाध्यक्ष मदनराव देवकाते, अनिल जगताप,
विश्वासराव देवकाते, योगेश
जगताप, करण खलाटे, संभाजी होळकर, लक्ष्मण मोरे, दिलीपराव ढवाण पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान, या आंदोलनाबाबत अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की हे आंदोलन केवळ सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पोटशूळ आहे.
राष्ट्रवादीच्या ताब्यातील कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नाही. आम्ही सभासदांना एकरी ३००० रुपयांचे अॅडव्हान्स बिल देऊन त्यांची
दिवाळी गोड केली आहे. विरोधकांनी प्रथम आपल्या कारखान्यांवर आंदोलने करावीत. कांडे बिल रोखण्याची परंपरा त्यांच्याच काळातील आहे. सन २००३, ४ व ७ च्या हंगामातही कांडे बिल देण्यात आले नव्हते.
पूर्वीच्या संचालक मंडळाने वेळेत साखर विक्री केली असती तर २५ ते ३० कोटींचा फायदा झाला असता. दर असताना साखर विक्री केली गेली नसल्याने आमच्यावर अधिकची साखर विक्रीची वेळ आली.
सोमेश्वर, छत्रपती व अजित
पवार यांच्या खासगी कारखान्यानेही याच वेळी साखर विक्री केली आहे. आम्ही वेगळे काहीही केलेले नाही. साखर विक्री करताना राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना विश्वासात
घेतले होते. (वार्ताहर)