राष्ट्रवादीचे ‘मूक आंदोलन’, सुप्रिया सुळेंनीही बांधली तोंडाला पट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:01 AM2018-10-03T02:01:55+5:302018-10-03T02:03:18+5:30
सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्त्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्त्वे असल्याची टीका या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्त्वांची उदाहरणे देण्यात आली.
पुणे : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, अंकुश काकडे हेही तोंडाला काळी पट्टी बांधून उपस्थित होते.
सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्त्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्त्वे असल्याची टीका या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्त्वांची उदाहरणे देण्यात आली. सरकारकडून सांगण्यात आलेले असत्य म्हणजे, राफेल विमान बनविण्याची एचएएल कंपनीची क्षमता नाही. हिंसा म्हणजे, विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही. अशांती म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना तत्काळ अटक केली नाही, असे एका फ्लेक्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याचबरोबर जवाब दो असे लिहून विविध प्रश्न करणारे फलक हातात धरले होते. तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन केले. शांततेत कुठलेही भाषण न करता हे आंदोलन केले. स्मरण महात्म्याचे... मूक आंदोलन जनसामान्यांचे... अशी टॅग लाईन या वेळी दिली होती.