राष्ट्रवादीकडून ‘काँग्रेस’ची कोंडी
By Admin | Published: March 30, 2015 05:35 AM2015-03-30T05:35:24+5:302015-03-30T05:35:24+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक निवडीवेळी काँग्रेसने कुरघोडी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे शहर, विधी,
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक निवडीवेळी काँग्रेसने कुरघोडी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे शहर, विधी, महिला- बालकल्याण व क्रीडा समिती अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर काँग्रेसला पाणी सोडावे लागणार आहे. यापुढे महापालिकेतील प्रत्येक महत्त्वाच्या विषयांत काँग्रेसची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून मनसेची साथ घेतली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र, मनसेचा एक सदस्य कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. मात्र, विविध विषयांवर अनेकदा सत्ताधारी आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू असते. सत्ताधारी आघाडीत एक वर्ष काँग्रेसला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, यंदाचे चौथ्या वर्षी ते देण्याची मागणी करीत काँग्रेसने उमेदवार उभा केला होता. मात्र, राष्ट्रवादीने मनसेची मदत घेत काँग्रेसची कोंडी केली. त्यामुळे स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे काँग्रेसने पीएमपी संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची कोंडी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांचा पराभव होऊन विजय देशमुख निवडून आले. त्याचा परिणाम विषय समिती सदस्यांच्या निवडीत दिसून आला आहे.
महापालिकेत काँग्रेस व मनसेचे संख्याबळ सारखेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पाठिंबा देईल, त्या पक्षाच्या एका वाढीव सदस्याची निवड विधी, शहर, महिला बालकल्याण व क्रीडा समितीमध्ये होणार होती. मात्र, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नसल्याचे ग्रहित धरून काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे विषय समित्यांमधील १३ सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे ५, मनसेचे ३, काँग्रेस २, भाजपा २ व शिवसेनेचा एक सदस्य आहे. सद्यस्थितीत चार समित्यांपैकी प्रत्येकी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र, नव्या समीकरणानुसार उमेदवार उभे करण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नाही. मंगळवारी विषय समिती अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होणार आहे. त्या वेळी उमेदवाराला सूचक व अनुमोदक देण्यासाठी तीन सदस्य आवश्यक असतात. मात्र, काँग्रेसकडे दोनच सदस्य आहेत. (प्रतिनिधी)