राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:36 PM2020-04-18T18:36:56+5:302020-04-18T18:37:39+5:30
व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी तसेच 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर हा निकाल देण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. बांदलसह आशिष हरिश्चंद्र पवार (वय-27), रूपशे ज्ञानोबा चौधरी (वय-45), रमेश रामचंद्र पवार (वय-32), संदेश वाडेकर यांनी अटक करण्यात आली आहे. बांदल यांनी अॅड. हर्षद निंबाळकर व अॅड. शिवम निंबाळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी रुपेश चौधरी सोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्यावतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना बांदल यांनी अॅड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बांदल यांचा थेट गुन्ह्यात संबंध नाही. खांद्याला दुखापत झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी निंबाळकर यांनी केली होती.