चांदणी चौकातील पूलावरून श्रेयवादाची लढाई; सुप्रिया सुळेंचा दावा अन् भाजपाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:18 PM2023-08-12T18:18:34+5:302023-08-12T18:19:26+5:30
या चौकातील काम रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण ...
पुणे : देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील एनडीए चौक (चांदणी चौक) उड्डाणपूल प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे तसेच खेड व मंचर बायपासच्या चौपदरीकरण कामाचे आज लोकार्पण झाले. काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चौकातील कोंडीत अडकले होते. तसेच त्यावेळी पुणेकरांनी त्यांच्या समस्याही मांडल्या होत्या. वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय करून मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या चौकातील काम रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. आज अखेर या कामाचे लोकार्पण झाले.
काल (११ ऑगस्ट) भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी नाराजी दर्शविली होती. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. यापूर्वी त्या कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी या परिसरातील कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्या व्हिडिओची एक क्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचबरोबर कार्यक्रमाची पत्रिका आणि त्याचे मेसेज पोस्टमध्ये टाकल्याने पुणे शहर भाजपमधील राजकारण दिसून आले होते. त्यानंतर लगेच सुत्रे हालली आणि सकाळी गडकरींच्या स्वागतासाठी भाजप शहराध्यक्षांसह मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर नितीन गडकरी हे कुलकर्णी यांच्या घरीही गेले. तिथे त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगितले जात आहे.
कामाच्या श्रेयवादावरून ट्विटर वॉरः
या पुलाच्या कामावरून श्रेयवाद चांगलाच पेटलेला दिसतोय. या कामासाठी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याबद्दलचे ट्विट करत त्यांनी खुलासा केला. सुळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पुणे शहरातील चांदणी चौक येथील वाहतूक आजपासून सुरळीत होत आहे. येथील कामांचे आज लोकार्पण होत आहे, याचे समाधान आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी यांनी वारंवार या कामाबाबत वैयक्तिक लक्ष घालून ते मार्गी लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कामावरील मजूर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी यांनी देखील अहोरात्र काम करुन हे काम पुर्णत्वास नेले. याशिवाय या काळात नागरीकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली त्यांनी जे सहकार्य केले ते खुप महत्वाचे आहे, याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार!'
पुणे शहरातील चांदणी चौक येथील वाहतूक आजपासून सुरळीत होत आहे. येथील कामांचे आज लोकार्पण होत आहे, याचे समाधान आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी यांनी वारंवार या कामाबाबत…
— Supriya Sule (@supriya_sule) August 12, 2023
तर या ट्विटला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उत्तर देण्यात येत आहे. त्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की चांदणी चौकाच्या कामासाठी सर्व भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. खासदार सुळे या विनाकारण याचे श्रेय घेत आहेत असंही म्हटले आहे.
🔸चांदणी चौकातील कामाची संकल्पना व त्याचा पाठपुरावा केला - भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष @Medha_kulkarni ताईंनी.
🔸संकल्पनेच्या मागे भक्कमपणे उभे राहिले - महाराष्ट्राचे लोकनेते @Dev_Fadnavis जी
🔸नेहमीप्रमाणे हे अद्वितीय कार्य करुन दाखवले - विकासपुरुष @nitin_gadkari… https://t.co/AvqAewPemk— Devashish Kulkarni (@AjaatShatrruu) August 12, 2023