शिस्तबद्ध संचलनाने एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:04 PM2021-10-29T19:04:54+5:302021-10-29T19:06:40+5:30

यावेळी गेली तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडत, जल्लोष केला.

nda convocation ceremony with disciplined movement pune | शिस्तबद्ध संचलनाने एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

शिस्तबद्ध संचलनाने एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

googlenewsNext

पुणे : डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास... लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा... विजय भारत... सारे जहा से अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४१ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि. २९) प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड ग्राऊंडवर पार पडला. पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘क्वाटर डेक’चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आला.

यावेळी गेली तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडत, जल्लोष केला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरावणे यांनी सोहळ्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे गेल्या तीन सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थींचे पालक, सन्माननीय पाहुणे यांना निमंत्रण दिले नव्हते. यंदा मात्र कोरोनानंतर प्रथमच मर्यादित स्वरूपात पालक आणि इतर निमंत्रित पाहुण्यांनी या संचलन सोहळ्यास उपस्थिती लावली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’च्या १४१व्या तुकडीत ‘ऑस्कर स्क्वाड्रन’ने सर्वोत्तम कामगिरी करून ‘चॅम्पियन स्क्वाड्रन’चा किताब पटकावला. त्यासाठीचा ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ त्यांना लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जनरल नरवणे यांच्या हस्ते ‘ऑस्कर स्क्वाड्रन’च्या वाम श्रीकृष्णला सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. ‘स्क्वाड्रन’च्या सिरीपुरल लिखित याला राष्ट्रपतींचे रौप्यपदक, तर ‘स्क्वाड्रन’च्या हर्षवर्धन सिंग याला राष्ट्रपतींचे कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.

लष्करी सेवेत दाखल होणारा घरातील मी पहिलाच-

मी मूळचा हैदराबाद येथील असून, माझे आई-वडील गेल्या सात वर्षांपासून दुबईत राहात आहेत. तेथे एका खासगी शाळेतून मी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. ‘एनडीए’तून प्रशिक्षण घेऊन लष्करात जाणारा मी माझ्या कुटुंबातील पहिलाच व्यक्ती असून, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी मला प्रोत्साहन दिले. मी माझ्या आई-वडिलांना, प्रशिक्षकांना अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मला लष्करात जायचे असल्याने मी पुढील प्रशिक्षणासाठी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत जाणार आहे. माझ्याप्रमाणेच अनेक युवक ‘एनडीए’त येऊन देशसेवा करतील, अशी मला आशा आहे.

- वश्मी श्रीकृष्ण, राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेता छात्र

आजचा दिवस अविस्मरणीय...

मी विशाखापट्टणम येथून आलो असून, माझे वडील भारतीय नौदलात कार्यरत आहेत. गोवळकोंड्यात शालेय शिक्षण घेत असताना, तेथील वरिष्ठांनी मला ‘एनडीए’त जाण्यास प्रोत्साहन दिले. जगातील सर्वोत्तम आणि प्रतिष्ठित अशा ‘एनडीए’मधून जोशपूर्ण वातावरणात मी माझे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. मी लष्करात जाणार असून, हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याच्या आठवणी मी आयुष्यभर जपेन.

- एस. लिखित, रौप्य पदक विजेता छात्र

एनडीएतून उत्तीर्ण होणे गाैरवाचा दिवस

मी मूळचा राजस्थानमधील जयपूर येथील असून, माझे वडील सरकारी शिक्षक आहेत, तर आई उत्पादन शुल्क निरीक्षक आहे. आठवीत असताना मी डेहराडून येथील राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून माझे नौदलात जाण्याचे स्वप्न होते. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होणे, हा माझ्यासाठी गौरवाचा दिवस असून, माझ्या स्वप्नाला मी खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.

- हर्षवर्धन सिंग, कांस्य पदक विजेता छात्र

Web Title: nda convocation ceremony with disciplined movement pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.