शिस्तबद्ध संचलनात एनडीएचा दीक्षांत सोहळा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 08:30 PM2019-11-30T20:30:47+5:302019-11-30T20:34:45+5:30
तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण केले पूर्ण
पुणे : डोळ्यात देशसेवेची स्वप्ने घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... येणाऱ्या आव्हानांना पेलण्याचा चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास..लष्करी बँडपथकाच्या कदम कदम बढायेजा... विजय भारत... सारे जहासे अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा खेत्रपाल परेड ग्राऊंडवर उत्साहात पार पडला. अतिशय कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या संचलनाने उपस्थित्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याचबरोबर आपल्या पाल्याला अधिकारी झाल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.
यावेळी अधिकारी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सुखोई लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दीक्षांत संचलन सोहळ्याची पाहणी केली. भावी अधिकाऱ्यांचा गणवेश, त्यांची शिस्त आणि आत्मविश्वासाचे कौतूक करत कॅडेट्सने यांनी दिलेली मानवंदना सिंह यांनी स्वीकारली. सकाळच्या थंडीत एनडीए कॅडेट्सने संचलनाचा सराव सुरू केला होता. बरोबर सकाळी ७.१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन झाले. संचलन बघण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक नातेवाईक यांच्याकडून त्यांचे हे क्षण कॅमेऱ्याने टिपले जात होते.
या वेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लेफ्टनंट जनरल सत्येंद्र्रकुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. व्हिपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर डमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागप्रमुख आणि प्रशिक्षक उपस्थित होते. या सोबतच तिन्ही दलाचे उच्चपदस्त अधिकारी या सोहळ्याला उपोस्थित होते.
संचलनात एकूण २८४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील १८८ छात्र लष्कराचे, ३८ छात्र नौदलाचे आणि ३७ छात्र हवाईदलातील होते. याशिवाय भूतान, ताजिकीस्तान, मालदिव, व्हिएतनाम, मॉरिशस, अफगानिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या मित्रदेशांतील २० छात्रांचाही या संचलनात समावेश होता. यावर्षी तिन्ही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अॅकॅडेमिक कॅडेट कॅप्टन माझी गिरधर याला राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. बटालीयन कॅडेट कॅप्टन कुष्करेजा मिश्रा हा राष्ट्रपती रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तर बटालीयन कॅडेट कॅप्टन एन. के. विश्वकर्मा हा राष्ट्रपती कांस्यपदकाचामानकरी ठरला. चिफ आॅफ स्टाफ बॅनरचा मानकरी चॅम्पियन स्कॉड्रन ठरली.
‘सारंग’ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कवायती!
सारंग या हेलिकॉप्टरच्या हवेतील चित्तथरारक भराºया हे यंदाच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. दीक्षांत संचलनानंतर ‘सारंग’ हेलिकॉप्टरच्या कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रबोधिनीच्या ‘सुदान’ या मुख्य इमारतींवरून आगमन झालेल्या सारंगने विविध सादरीकरणांतून उपस्थितांना रोमांचक अनुभव दिला. हेलिकॉप्टरच्या पायलटने केलेल्या कसरती पाहताना उपस्थितांच्या नजरा खिळल्या. पावणी लवताच सारंग आणि हेलिकॉप्टरच्या होणाऱ्या हालचाली पाहून उपस्थित अचंबित झाले. फ्रन्ट फॉरमेशन, डायमंड फॉरमेशन, लाईन असर्टन फॉरमेशन, सिनक्रोनाईज स्टाल टर्नम क्रॉस ओव्हर ब्रेक या सारख्या थरारक कवायतींनी उपस्थितांचा श्वास काही काळासाठी रोखून धरला होता.
सिनिअर कॅडेटमुळे मिळाली प्रबोधिनीत पहिला येण्याची परंपरा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पहिल्या वर्गात शिकत असताना, माझ्या वरिष्ठ तुकडीतील कॅडेटला ‘प्रेसिडेन्ट गोल्ड मेडल’ मिळाले होते. त्यावेळी त्याला मिळालेला सन्मान पाहून आपणही चांगली कामगिरी करून हे पदक मिळवावे, अशी इच्छा निर्माण झाली. त्यानुसार मेहनत केली आणि आज हे यश अनुभवता आले, याचा अभिमान वाटत आहे, असे मत प्रबोधिनीच्या तिन्ही वर्षांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला माझी गिरधर याने व्यक्त केले. माझी याचे वडील कोळखा खाणीत पर्यवेक्षक आहेत. कुटुंबामध्ये लष्करात दाखल होणारा तो पहिला व्यक्ती आहे. तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधी खडतर आणि आव्हानात्मक होता. मात्र, मित्र आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे हे प्रशिक्षण सहज पूर्ण केल्याचे माझी याने सांगितले. भविष्यात लष्कराच्या पायदळ विभागात दाखल होणार असून यासाठी डेहराडून येथील इंडियन मिलीटरी अॅकेडमीत तो पुढील प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
-----
प्रबोधिनीतील प्रशिक्षणामुळे जीवनात आमुलाग्र बदल
लहानपणापासून हवाई दलाचे आकर्षण होते. यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत येण्याची पे्ररणा मिळाली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज (आरएमसी) येथून माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या दररम्यान मी एनडीएची तयारी केली आणि मी परीक्षेत यश मिळवले, असे राष्ट्रपती रौप्य पदक विजेता कुशाग्र मिश्रा याने सांगितले. कुशाग्रचे वडील वडील मेरठ आयटीआय मध्ये प्राचार्य असून आई गृहिणी आहे. आरएमसीतील जवळपास २८ जण एनडीएसाठी प्रात्र ठरली आहे. ब्रांझ पदक विजेता निशांत विश्वकर्मा हा कुशाग्रच्या वर्गमित्र आहे. प्रबोधिनीच्या खडतर प्रशिक्षणामुळे आमच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे, असे कुशाग्र म्हणाला. एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुशाग्र हा हैदराबाद येथील एअर फोर्स अकॅडमी मध्ये मी पुढील शिक्षणासाठी जाणार आहे. त्याने एनडीएत सुपर डोमिनो विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले असून लढाऊ वैमानिक होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
------
मोठ्या भावाच्या प्रेरणेने एनडीएत दाखल
मध्यप्रदेश मधील कामगड याठिकाणचा मी मुळचा रहिवासी असून माझे वडील पशुवैद्यकीय अधिकारी असून आई गृहिणी आहे. मला दोन भाऊ असून ते अभियंता आहेत. मोठ्या भावाने डेहाराडून येथील आरएमसी मध्ये शिक्षण पूर्ण केले असल्याने त्याच्याकडून लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळालेली आहे. एनडीएत बीटेक शाखेत यंदा मी प्रथम आलेलो असून नौसेनेत लवकरच दाखल होणार आहे, असे राष्ट्रपती कांस्य पदक विजेता निशांत विश्वकर्मा म्हणाला.
फोटो :