एनडीएतील प्राध्यापक निवड, नियुक्तीमध्ये गैरव्यवहार : सीबीआयचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 09:17 PM2018-06-06T21:17:09+5:302018-06-06T21:17:09+5:30
सीबीआयने या प्राध्यापकांच्या कार्यालये व निवासस्थानावर छापे घालून झडती घेण्यात आली़ असून त्यात काही महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले.
पुणे : भारतीय सैन्य दलासाठी लष्करी अधिकाऱ्यांना घडविणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा मारला़ प्राध्यापकांची निवड आणि नियुक्तीमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे चौकशी करण्यात आली. सीबीआयने एनडीएच्या प्राचार्यांसह प्राध्यापकांवर संगनमताने कट करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़
सीबीआयच्या पथकाकडून त्यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एनडीएचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, प्रा. जगमोहन मेहेर, सहप्राध्यापक वनिता पुरी, प्रा.राजीव बन्सल, प्रा. महेश्वर रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्ला, प्रा.मेहेर, प्रा.पुरी, प्रा. बन्सल, प्रा. रॉय यांनी एनडीएत प्राध्यापक भरती प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.
एनडीएच्या काही शिक्षकांनी अज्ञात अधिकाऱ्यांसह युपीएससी आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह कट रचला. अत्यावश्यक शिक्षण आणि संशोधन, अनुभव न घेता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील शिक्षण विद्या शाखेच्या विविध पदांवर निवड आणि नियुक्ती केली़ युपीएससीच्या नियमानुसार आणि संरक्षण मंत्रालयाच्या आवश्यकतेनुसार बनावट प्रमाणपत्रांच्या आधारांवर त्यांची सेवा आणि शिक्षण अनुभव दर्शविणारी कागदपत्रे तयार केली़. त्यांची अतिरंजित शैक्षणिक कामगिरी निर्देशक (एपीआय) गुण दर्शवून त्याची प्रमाणपत्रे युपीएससीकडे पाठविण्यात आली असल्याचा संशय सीबीआयला आहे़. त्यामुळे सीबीआयने या प्राध्यापकांच्या कार्यालये व निवासस्थानावर छापे घालून झडती घेण्यात आली़ त्यात काही महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पुढे तपास सुरु असल्याचे सीबीआयने सांगितले़.
याबाबत एनडीएने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बुधवारी सकाळी सीबीआयच्या पथकाने एनडीएला भेट देऊन आरोपांची माहिती दिली़. त्यांच्याबरोबर आवश्यक त्या परवानग्या होत्या़. काही शैक्षणिक सदस्यांच्या निवड प्रक्रियेच्या वेळी आणि युपीएससीने एनडीएला या सदस्यांची नियुक्ती करताना अयोग्य कागदपत्रे सादर केल्यासंबंधी तक्रारी असल्याचे सांगण्यात आले आहे़. सीबीआयला सर्व सहकार्य करण्यात येत आहे़. एनडीए ही देशातील एक प्रतिष्ठित सैन्य प्रशिक्षण देणारी संस्था असून त्यात अनेक परदेशी उमेदवारही प्रशिक्षणासाठी येत असतात़.या लष्करी अधिकाऱ्यांना लष्करी प्रशिक्षणाबरोबर विविध विषय शिकविण्यासाठी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते़. या प्राध्यापकांच्या शैक्षणिक अर्हतेविषयी तक्रारी असल्याने सीबीआयने बुधवारी कारवाई केली आहे़.