एनडीएचा व्हाइट पेट्रोल गणवेश सुवर्णमहोत्सवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 08:16 PM2019-05-30T20:16:37+5:302019-05-30T20:25:22+5:30
तब्बल ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेचे पहिले साक्षीदार असलेल्या ३६ व्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी १३६ व्या तुकडीच्या संचलन सोहळ्यात एकत्र येत व्हाइट पेट्रोल गणवेशाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला.
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर दीक्षांत सोहळा खाकी गणवेशात केला जायचा. मात्र, १९६९ पासून उन्हाळ्यात पांढरा आणि हिवाळ्यात निळ्या रंगाच्या गणवेशात असे वर्षातून दोनदा दीक्षांत सोहळ्याची परंपरा सुरू झाली. तब्बल ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेचे पहिले साक्षीदार असलेल्या ३६ व्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी १३६ व्या तुकडीच्या संचलन सोहळ्यात एकत्र येत व्हाइट पेट्रोल गणवेशाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची ३६ वी तुकडी ‘व्हाइट पेट्रोल’ गणवेशात देशसेवेसाठी बाहेर पडली. या तुकडीने देशाला अनेक लष्करी अधिकारी, हवाईदल प्रमुख आणि उच्चपदस्थ अधिकारी दिले. १९७१च्या युद्धात या तुकडीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पाकिस्तानच्या प्रदेशात विजेच्या वेगाने जाऊन शत्रूचा धुव्वा उडवला. यासोबतच श्रीलंकेत गेलेल्या शांतीसेनेत आणि कारगिल युद्धातही नेत्रदीपक कामगिरी बजावली. प्रबोधिनीच्या १३६ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात उपस्थित एकत्र येत ३६ व्या तुकडीतील अधिकाºयांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यामध्ये मेजर जनरल टी. पी. सिंग, ब्रिगेडियर एस. के. स्माइल, ब्रिगेडियर अजित आपटे, कर्नल सुधीर फड, कर्नल पी. डी. शिरनामे, कर्नल अशोक पुरंदरे, कर्नल भगतसिंह देशमुख यांचा समावेश आहे. प्रबोधिनीचा सर्वोच्च सन्मान असणारी संचलनाची अनुभूती हा नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव असतो. परंतु तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या बॅचमेटसोबत हा सोहळा अनुभवताना एक विलक्षण अनुभूती होत असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली.
याबाबत निवृत्त कर्नल सुधीर नाफडे म्हणाले, की प्रबोधिनीतून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतानाचा क्षण हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. या ५० वर्षांच्या काळात प्रबोधिनीत अनेक बदल झाले आहेत. विशेषत: तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रबोधिनीने अतिशय चांगले बदल आत्मसात केले आहेत. मात्र हे बदल स्वीकारत असतानाही प्रबोधिनीची मूळ परंपरा आणि प्राचीन वारसा अगदी जशास तसा जपला आहे. याचे खरोखरच अभिमान वाटते. त्यामुळेच ही संस्था लष्करी प्रशिक्षणातील सर्वोत्तम संस्था आहे.''
निवृत्त कर्नल भगतसिंग देशमुख म्हणाले, की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधितील वातावरण आजही आम्हाला उत्साही करते. आम्ही १८७१ च्या युद्धात शत्रूला सळो की पळो करून सोडले. युद्धातही आम्ही नेत्रदीपक कामगिरी केली. आज आम्ही निवृत्त झालो असलो तरी सामाजिक कार्याद्वारे प्रबोधिनीचे काम आजही आम्ही सुरू ठेवले आहे.
..........................
३६ व्या तुकडीतील जनरल व्ही. के. सिंग झाले लष्करप्रमुख
व्हाइटवॉश गणवेशाची परंपरा १९६९ पासून ३६ व्या तुकडीपासून सुरू झाली. या तुकडीने ५० वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष युद्धात, अनेक दहशतवादविरोधी कारवाया आणि कारगिल युद्धात सहभाग नोंदवला. माजी लष्करप्रमुख आणि आताचे खासदार निवृत्त जनरल व्ही. के. सिंग हे लष्करप्रमुख झालेत. येत्या काही दिवसांत या तुकडीतील विद्यार्थी एकत्र येत प्रबोधिनीत स्रेहमेळावा साजरा करणार आहेत.