शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजणे गरजेचे : डॉ. नारळीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 03:51 IST2018-12-09T03:50:44+5:302018-12-09T03:51:23+5:30
मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजणे गरजेचे : डॉ. नारळीकर
पुणे : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान हा विषय शिकवताना केवळ पुस्तकांवर अवलंबून न राहता त्यातील मर्म विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवे. मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने जनता वसाहत येथील प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीतील विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसोबत पुणे विद्यापीठ येथील आयुका या विज्ञान शोधिकेमध्ये डॉ. जयंत नारळीकर, मंगला नारळीकर यांनी संवाद साधताना विज्ञानातील गमती जमती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अवकाश विज्ञान या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेतील जंगलात झिम्बाब्वे या देशात गेलो असताना सूर्यग्रहणामुळे अंधार पडला. रात्र झाली असे समजून त्या जंगलातील पाणघोडे आम्हाला खाण्याकरिता अंगावर धावून आले. मात्र थोड्याच वेळात ग्रहण संपले व सूर्यप्रकाश पडला. त्यामुळे ते पाणघोडे परत निघून गेले. अशाप्रकारे सूर्यग्रहणाने आमचा जीव वाचला. डॉ.नारळीकरांनी हा प्रसंग वर्णन करताना सर्व विद्यार्थी चकित झाले होते.