कलांची हवी जोपासना : मोरेश्वर बुवा जोशी; महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:52 PM2018-01-01T12:52:51+5:302018-01-01T12:53:53+5:30
कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले.
पुणे : शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. देव, देश, धर्म यांचा वारसा घेऊन हजारो वर्षांची कीर्तनकारांची, संतांची, शाहिरांची परंपरा आहे. देवाचे अभिवादन आणि समाजाचे जागरण या दोन्ही गोष्टी या कलांमधून साधल्या आहेत. सध्या होणारे पाश्चात्यांचे आक्रमण आणि समाजामध्ये असणाऱ्या बुद्धीभेदाला उत्तर देण्याचे सामर्थ्य या सगळ्या परंपरांमध्ये आहे. अशा कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले.
लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कीर्तनकार तुकाराममहाराज निंबाळकर, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे, गोंधळी बागुजी रेणके, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. चºहोलीकर म्हणाले, एखाद्या परिस्थितीचा गांभीयार्ने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य पोवाड्यामध्ये आहे. आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन घडवण्याचे काम अनेक वर्षे शाहीर करीत आहेत. अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. देश पारतंत्र्यात असताना शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण केले आहे. त्यामुळे शाहिरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.
प्रकाश ढवळे म्हणाले, डॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा. आपल्या कलेतून संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे संस्कृतीचे वारसदार व्हा. गुरुंनी शिकविलेल्या कलेकडे गांभीयार्ने बघा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पणाची भावना मनामध्ये असेल तर विद्या प्राप्त होईल. शाहिरी करण्यासाठी प्रतिभाशक्ती, अभिनयकौशल्य, लेखन, स्मरणशक्ती, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण हे गुण असावे लागतात. शाहिरी ही शिवाजीमहाराजांची सेवा आहे, त्यामुळे ती केवळ स्नेहसंमेलनापुरती मर्यादित ठेवू नका.ह्ण आदिती कालेकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.