वर्षभर सातत्याने रक्तदान होण्याची गरज - डॉ. अतुल कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:26 AM2018-06-15T02:26:38+5:302018-06-15T02:26:38+5:30
कार्ल्स लँडस्टायनर यांनी रक्तघटकाचा शोध लावला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ जागतिक रक्तदान दिन जगभर साजरा केला जातो. रक्तदानाची जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, यासाठी हा दिन साजरा होतो.
कार्ल्स लँडस्टायनर यांनी रक्तघटकाचा शोध लावला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ जागतिक रक्तदान दिन जगभर साजरा केला जातो. रक्तदानाची जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, यासाठी हा दिन साजरा होतो. सध्या रक्तदानाबाबत बऱ्यापैैकी जनजागृती झालेली असली, तरी रक्तदान त्या प्रमाणात होत नाही. एकाच वेळी रक्त संकलित करणे अवघड असते, त्यामुळे वर्षभर सातत्याने रक्तदान होणे गरजेचे आहे, अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली. जागतिक रक्तदान दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
आपल्याकडे रक्ताची गरज ३६५ दिवस असते. कारण प्रत्येक रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण असतात. त्यांना रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे सातत्याने रक्तदान होणे गरजेचे आहे. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या श्रेष्ठ दानात सहभाग घ्यायला हवा.
आपल्या शरीरात ४ ते ५ लिटर रक्त असते. एका व्यक्तीकडून ३५० ते ४५० मिली रक्त घेतले जाते. एक रक्तदाता वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकतो. एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिन्यांत त्याचे आरोग्य रक्त पुन्हा देण्यासाठी तयार होते. रक्तदान केल्यावर २४ ते ४८ तासांमध्ये ते रक्त निर्माण होत असते. त्यामुळे अनेक जणांचा असा गैरसमज आहे, की रक्तदान केल्यावर अशक्तपणा येतो. परंतु, असे काहीही होत नाही. आज पुणे शहरात असे रक्तदाते आहेत, की ज्यांनी शंभर वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्यामध्ये कधीही अशक्तपणा आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. त्यातून अनेकांना जीवनदान मिळू शकते.
रक्तदान करण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच आम्ही रक्तदान करून घेतो. सध्या महिलांमध्ये रक्तदान करण्याची भावना वाढली आहे. परंतु, अनेक महिलांचे आरोग्य ठीक नसते. त्यांच्यात वजन आणि हिमोग्लोबिन कमी भरते. परिणामी अनेक महिलांना रक्तदान करता येत नाही. समाजात रक्तदानाबाबतचे दोन गट आहेत. एक ‘आहे रे’ गट आणि दुसरा ‘नाही रे’ गट. ज्यांच्याकडे खूप संपन्नता आहे, ते चांगले हेल्दी आहेत. परंतु, त्यांच्यामध्ये रक्तदान करण्याची इच्छाच नाही. असा एक गट आहे. परंतु, ‘नाही रे’ गट म्हणजे ज्यांना रक्तदान करायचे आहे परंतु, त्यांच्याकडे वजन किंवा हिमोग्लोबिन कमी आहे. या दोन्ही गटांमध्ये योग्य प्रमाणात जनजागृती केली, तर दोन्ही गट रक्तदान करू शकतील. ज्या महिलांचे आरोग्य रक्तदान करण्यासाठी योग्य नसते, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. महिला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देताना स्वत:चे आरोग्य नीट ठेवत नाहीत. त्यांनी स्वत:चे आरोग्य जपले पाहिजे. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य चांगले नसणे, ही एक सामाजिक आरोग्यातील मोठी समस्या आहे. सध्या महिलांमध्ये जनजागृती वाढल्यामुळे त्या रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
सध्या ४२ दिवसांपर्यंत रक्त साठवून ठेवता येऊ शकते. खरं तर अनेकदा खूप शिबिरं होतात. तेव्हा खूप रक्त संकलित होते. परंतु, जर ४२ दिवसांपर्यंत ते वापरले नाही, तर त्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून नागरिकांनीच एका वेळी रक्तदान न करता ठराविक वेळी करणे आवश्यक आहे. शिबिर संयोजकांनी देखील याबाबत योग्य काळजी घेतली पाहिजे.
रक्तदानाबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक आहेत. अधिकाधिक लोकांनी रक्तदान केले पाहिजे. त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहील. शरीरात नवीन रक्त तयार होईल. पुण्यात रक्त कमी पडू नये, यासाठी जनकल्याण रक्तपेढीतर्फे मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा असतो. परंतु, यंदा आम्ही योग्य नियोजन करून हा तुटवडा होऊ दिला नाही. आमच्याकडे येणाºया प्रत्येकाला रक्त देण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाला कुठेही रक्त कमी पडू नये, हाच जनकल्याण रक्तपेढीचा आणि तेथील कर्मचाºयांचा मानस आहे.