रंगभूमीचा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता
By admin | Published: June 26, 2017 03:51 AM2017-06-26T03:51:30+5:302017-06-26T03:51:30+5:30
कर्तृत्ववान तरुण कलाकार मंडळींनी पूर्वीपासून कलेच्या दृष्टीने रंगभूमी धनवान कशी होईल, हे पाहिले. या मातब्बर मंडळींनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्तृत्ववान तरुण कलाकार मंडळींनी पूर्वीपासून कलेच्या दृष्टीने रंगभूमी धनवान कशी होईल, हे पाहिले. या मातब्बर मंडळींनी निर्माण केलेला दर्जा तरुणांनी रंगभूमीला वाहून घेत टिकविण्याची आवश्यकता आहे. रंगभूमीचा वारसा पुढे चालवून उंची प्राप्त करून देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तसेच ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार अनिल शिरोळे, महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, सिद्धार्थ शहा, सुधीर मांडके, अंकुश काकडे, दीपक साळुंखे, कृष्णकुमार गोयल, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोरे यांनी आभार मानले.
तत्कालीन आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावरून वाद सुरू होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण तेव्हा नेमके पुण्यात होते. मी त्यांना ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला बालगंधर्वमध्ये घेऊन आलो. या नाटकाने महाराष्ट्रात पगडा निर्माण केला होता. ते केवळ राज्यापुरते उरले नव्हते. नंतर मला एकदा आमचे गुरू नरूभाऊ लिमये भेटले. ते म्हणाले की, तुला काही कळते का? तू यशवंतरावांना त्या नाटकाला का घेऊन गेलास? जुन्या पिढीतील लोकांना अनेक गोष्टी मान्य नसायच्या. जब्बारने मेहनतीने हे नाटक केले. भालबा केळकर यांनी पीडीए संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटके रंगभूमीला दिली, असेही ते
म्हणाले.
रोहिणी हट्टंगडी यांचा गौैरव करताना पवार म्हणाले, ‘रोहिणीतार्इंनी सशक्त अभिनयाची छाप उमटवली. अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या.
रिचर्ड अॅटोनबोरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबाजींची व्यक्तिरेखा रोहिणीतार्इंनी कौशल्याने साकारली. आपल्या कलेशी समरस होऊन वर्षानुवर्षे दर्जा सांभाळून
आणि रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून सातत्याने यश मिळवणे अवघड काम आहे. ते रोहिणीतार्इंनी केले आहे. हट्टंगडी दाम्पत्याने
कलेची सेवा केली आहे.
दिल्लीत वेगळ्या घडामोडी सुरू असतानाही, मी रोहिणीतार्इंचा सत्कार करायचा आहे, असे सांगून आलो आहे.’