प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:08 AM2018-09-17T02:08:02+5:302018-09-17T02:08:21+5:30

प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Need to Change First Mental Mind - Medha Kulkarni | प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

Next

मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास सुरुवात होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

‘ती’ची अस्मिता टिकवण्याच्या, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. समाजाची जडणघडण करण्यामध्ये ‘लोकमत’ने पुढचे पाऊल टाकले आहे. गणपती कोणी बसवला, आरती कोणी केली, गणेश मंडळांमध्ये किती महिला पदाधिकारी आहेत, या बाबी महत्त्वाच्या आहेतच; मात्र, याबरोबरच मंडळात जे पदाधिकारी आहेत किंवा गणपती पाहण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्या मनात महिलांबद्दल किती आदराची भावना आहे, यावरही महिलांची सुरक्षितता अवलंबून आहे. गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असायलाच हवा. जेणेकरून, मंडळाच्या कार्यपद्धतींमध्ये आखीव-रेखीवपणा येऊ शकतो. मंडळांची विशिष्ट आचारसंहिता तयार होऊन तिचे पालन केले जाईल. जिथे महिला आहेत, तिथे शिस्तप्रियता आहे, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये, विशेषत: गणेश मंडळांमध्ये महिलांचा समावेश, सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून अवैध गोष्टींना आळा बसू शकतो. शिस्त आल्यामुळे गणेशोत्सवाचे रूप पालटण्यासही मदत होऊ शकते.
दहा दिवसांमध्ये शहरात गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी असते. यामध्ये महिला, तरुणींचाही समावेश असतो. बरेचदा, महिलांना छेडछाड, शेरेबाजी अशा घटनांना सामोरे जावे लागते आणि मनात भीती उत्पन्न होते. महिला, तरुणींना निर्भयपणे गणपती पाहण्यासाठी येता यावे, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. आपल्याही घरामध्ये आई, पत्नी, बहीण, मुलगी असते, त्याप्रमाणे गणपती पाहायला येणाºया महिलाही कोणाची तरी बहीण, मुलगी असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे, अशा स्वरूपाची मानसिकता प्रत्येक पुरुषामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
शाळकरी मुलगी असो महिला अथवा वृद्ध स्त्री, आजकाल समाजात कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाही. तिने कोणती चूक केली, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला? यामध्ये मुलींची कोणत्याही प्रकारची चूक नसून, पुरुषांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार बिंबवण्याची सुरुवात घरापासूनच होते. यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जडणघडणाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. घरामध्ये मुलगा आणि मुलीवर समान संस्कार करण्याची गरज आहे. मुलीची जडणघडण करताना ‘तू घाबरू नकोस, निर्भयपणे जग, कोणताही न्यूनगंड बाळगू नकोस, तू मुलापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाहीस’, हा एक संस्कारांचा भाग आहे. समाजाची कल्पना देतानाच तुझ्यावर काही आघात झाल्यास तू त्याचा कशा प्रकारे सामना केला पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने ठाम राहशील, अशी प्रवृत्ती मुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास किमान सुरुवात होऊ शकते. पालकांनी केवळ आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळू शकेल. पुरुषांची मानसिकता बदलल्यास अत्याचारांचे प्रमाण रोखता येईल आणि ‘ती’च्या दृष्टीने प्रत्येक दिवस उत्सवी आणि सुरक्षित होईल.

Web Title: Need to Change First Mental Mind - Medha Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.