समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 06:36 PM2019-12-08T18:36:31+5:302019-12-08T19:02:34+5:30

लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज...

Need to change the mindset of the society: Vice President Venkaiah Naidu | समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

googlenewsNext
ठळक मुद्देसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभभाषणाला मराठीतून सुरूवात  

पुणे : ‘निर्भया’ नंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे, परंपरांगत चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले.
लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभ प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केले.
व्यंकय्या नायडू म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा ,गुरूंजणांचा, वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठांचा व आपल्या बहिणींचा आदर ठेवण्याबाबत मुलांना लहानपनापासून शिकवले पाहिजे. समाजात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते.जीवनात निर्माण झालेल्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी मनोगत व्यक्त केले. 
--
विद्यापीठांच्या क्रमवारीत वाढ व्हावी...
इंग्रज अधिकारी मेकॉले याने देशाला दिलेल्या शिक्षण पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचा इतिहास चूकीच्या पध्दतीने लिहिला असून खरा इतिहास समाजपर्यंत पोहचत नाही, अशी खंत व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही. परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. मात्र, आपल्या आई-वडिलासाठी, समाजासाठी, मातृभूमिच्या सेवेसाठी परत आले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.
........
भाषणाला मराठीतून सुरूवात  
व्यंकय्या नायडू यांनी पदवी प्रदान समारंभ प्रसंगी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंबायोसिसचा गौरव करताना व्यंकय्या नाडू म्हणाले, सध्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षणासाठी येत आहेत, ही गौरवाची बाब आहे.

Web Title: Need to change the mindset of the society: Vice President Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.