अहिराणी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज
By admin | Published: April 25, 2016 01:04 AM2016-04-25T01:04:24+5:302016-04-25T01:04:24+5:30
अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत.
पिंपरी : अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत. अहिराणी भाषा, म्हणी, ओव्या, लग्नातील गाणी, कानबाई-गौराई गीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. उषा सावंत यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने एकदिवसीय तिसरे राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. प्रारंभी गौराई, साने गुरुजी व बहिणाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके, महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, मंचाच्या संस्थापक विजया मानमोडे, ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे, निर्माते कैलास वाणी, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीस राजभाषा म्हणून मान्यता
मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. खान्देश सांस्कृतिक भवनाची मागणी करणार आहे.’’
पद्मश्री स्व. डॉ. भवरलाल जैन यांना मरणोत्तर ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनूर’ पुरस्कार, साहित्यिक देविदास हटकर यांना साहित्यरत्न, उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उत्पादनशुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक मोहन वर्दे यांना विशेष सेवा, कुंदन ढाके यांना खान्देशरत्न पुरस्कार, उद्योजक काकासाहेब चौधरी, सुरेश पवार, सुरेश पाटील, दादाभाऊ पाटील, पिंगळे यांना खान्देशभूषण, कैलास वाणी यांना कलारत्न, दीपक पाटील यांना उद्योगरत्न, आमदार उन्मेश पाटील यांना समाजव्रती, गायक शिवदास जोंधळे यांना कलारत्न, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना समाजरत्न, पत्रकार दीपेश सुराणा यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. लतिका चौधरी यांच्या ‘गल्लीनी भाऊबंदकी’, तसेच ‘आखाजी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.(प्रतिनिधी)