हल्लेखोर झुंडशाही आवरण्याची गरज

By admin | Published: March 21, 2017 05:32 AM2017-03-21T05:32:15+5:302017-03-21T05:32:15+5:30

डॉक्टरांवर जे हल्ले होतात, त्यामागे काहीदा डॉक्टरांचीही चूक असते. हल्ले म्हणजे उद्रेक, प्रतिक्रिया असतात. मात्र ही हल्ले करणारी झुंडशाही

The need to cover the invading hierarchy | हल्लेखोर झुंडशाही आवरण्याची गरज

हल्लेखोर झुंडशाही आवरण्याची गरज

Next

पुणे : डॉक्टरांवर जे हल्ले होतात, त्यामागे काहीदा डॉक्टरांचीही चूक असते. हल्ले म्हणजे उद्रेक, प्रतिक्रिया असतात. मात्र ही हल्ले करणारी झुंडशाही आहे, तिला आवर घालण्याची मानसिकता शासनामध्ये निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या आरोग्यावर वाचू काही, वैद्यकीय उपकरणांच्या जगतात आणि लाखातील एक आजार या पुस्तक त्रयीचे प्रकाशन भंडारी यांच्या हस्ते झाले. ससून रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, स्नेहल प्रकाशनचे प्रकाशक रवींद्र घाटपांडे, लेखक श्याम भुर्के व्यासपीठावर होते. अध्यक्षस्थानी प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये होते.
केंद्र शासनाच्या आरोग्य धोरणात डॉक्टरांच्या काही उपयुक्त सूचनांचा अंतर्भाव आहे, असे सांगून भंडारी म्हणाले, की आजही दुर्गम भागातील २५ ते ३० खेड्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्या भागातील रुग्णाने सरकारी दवाखान्यात यावे, तर तेथील अन्य ठिकाणच्या अतिरिक्त कार्यभारामुळे डॉक्टर नसतात. ही स्थिती सुधारण्याची गरज आहे.
मुळा-मुठा नदीला आलेले गटाराचे स्वरूप बदलण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले. नदी शुद्धिकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. ८०० कोटी रुपये खर्चून या नद्या शहराचे वैभव बनावे यासाठी काम सुरू आहे, असे भंडारी यांनी डॉ. चंदनवाले यांच्या वक्तव्यावर बोलताना नमूद केले.
डॉ. चंदनवाले म्हणाले, की आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणात संशोधनाला वाव नसल्याने बुद्धिमान विद्यार्थी परदेशात जाऊन संशोधन करतात. त्यांच्या संशोधनावर तो देश पेटंट मिळवितो. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत डॉ. चंदनवाले यांनी चिंता व्यक्त केली. हल्ले वाढत गेले तर बुद्धिमान विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणाकडील ओढा कमी होऊन अखेर समाजाचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मध्यमवर्गीय रुग्ण कॉर्पोरेट रुग्णालयात जाऊ शकत नाही. सरकारी रुग्णालय गरिबांसाठी असते हा डाग पुसून काढत सरकारी रुग्णालयांमधील वर्ग गरीबच नव्हे, तर मध्यमवर्गीयसुद्धा असावा, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
डॉ. भोंडवे यांनी प्रारंभी पुस्तकलेखनामागील भूमिका सांगितली. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The need to cover the invading hierarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.