डिजिटल युगात एकलव्य शिक्षण पध्दती हवी: राम ताकवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 07:13 PM2018-05-10T19:13:52+5:302018-05-10T19:13:52+5:30
डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल.
पुणे: डिजिटल युगात एकलव्याची शिक्षण पध्दती आणावी लागणार आहे. तसेच स्वत:चे, समाजाचे आणि विद्यापीठाचे भवितव्य घडवणारे विद्यार्थी तयार करावे लागणार आहेत. डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल,असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या ५४व्या वर्धापनदिन समारंभात ताकवले बोलत होते.या प्रसंगी भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्याध्यक्ष आनंदराव पाटील,कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, सरकार्यवाह डॉ. व.भा.म्हेत्रे, डॉ.एस.एम.सगरे आदी उपस्थित होते. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विद्यापीठाचा वर्धापनदिन शोकाकुल वातावरणात आणि साधेपणाने संपन्न झाला. यावेळी प्रा.मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या विचारभारतीच्या डॉ.पतंगराव कदम स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
ताकवले म्हणाले,पतंगराव यांना स्वप्नपूर्तीचे वरदान लाभले होते. स्वप्न पाहायचे आणि ते सत्यात उतरविण्यासाठी जीवाचे रान करायचे हा त्यांचा स्वभाव होता, असे नमूद करून ताकवले म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,बापूजी साळुंके यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था काढल्या. पतंगराव कदम यांनी महानगरात शिक्षण संस्था काढून त्याच्या शाखा - उपशाखा ग्रामीण भागापर्यंत नेल्या. तंत्रज्ञान हे क्रांतीचे कारण असले तरी तंत्रज्ञानाचा वापर ज्या माणसाकडून केला जातो.त्याची बुध्दीमत्ता ही अधिक महत्त्वाची असते.
विश्वजीत कदम म्हणाले,पतंगराव कदम यांनी शून्यातून आयुष्याची उभारणी केली. स्वत:ला शिक्षण घेताना आलेल्या अडचणी गरीब मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.भविष्यात शिक्षण संस्थांसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. शिक्षण संस्थांसमोर येणा-या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. तसेच त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबध्द राहणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उत्तेकर व डॉ.ज्योती मंडलिक यांनी केले.तर डॉ.एम.एस.सगरे यांनी आभार मानले.