संशोधनावर भर देण्याची गरज
By admin | Published: April 10, 2017 01:37 AM2017-04-10T01:37:18+5:302017-04-10T01:37:18+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून मानांकन दिले. त्यात अभिमत विद्यापीठामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शिक्षण, संशोधन, नोकरीची संधी, सर्वसमावेशकता, लोकांचे मत या निकषांच्या आधारे हे मानांकन मिळाले. विद्यापीठांनी संशोधनावर भर देण्याची गरज आहे, असे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून त्यांना मानांकन दिले. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या संस्थेच्या वतीने हे मूल्यांकन केले. त्यात शिक्षण पायाभूत सुविधा, शिक्षणप्रणाली, शिक्षणक्षेत्रात असणारे योगदान, संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील गुणवत्ताधारक अभिमत विद्यापीठांच्या यादीमध्ये पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठास राज्यात पहिला क्रमांक मिळाला. ही आनंददायी बाब आहे. गेल्या ३५ वर्षांत विद्यापीठाच्या माध्यमातून केलेल्या तपश्चर्येचे हे फळ आहे.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘युवक हीच राष्ट्राची प्रमुख शक्ती आहे आणि त्या माध्यमातून आपण महासत्ता बनू शकतो’ असा आशावाद तरुणाईच्या डोळ्यांत पाहिला. याच उद्देशाने शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य केले जात आहे. ‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आहे. आमच्या अथक प्रयत्नांमुळे हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध पावले आहे. गुणात्मक शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनआयआरएफ संस्थेच्या वतीने शिक्षण (टीचिंग-लर्निंग), संशोधन (रीसर्च), शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरीची संधी (गॅ्रज्युएट आउटकम), सर्वसमावेशकता (आउटरिच इनक्लिब्लिटी), लोकांचे मत (परसेप्शन) या निकषांच्या आधारे विद्यापीठांचे मूल्यांकन करून मानांकन दिले आहे.
मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, आॅप्टोमेट्री अशा एकूण सात शाखा आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये ुसुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, आजवर ८३५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. देशातील विविध भागांतील मुले पीएचडीही करीत आहेत. संशोधनाची गुणवत्ता तपासण्यासाठी इतरांनी त्या संशोधनाचा किती वेळा आधार घेतला, याची तपासणी एनआयआरएफ संस्थेकडून करण्यात आली. संशोधनाचा दर्जा तपासण्यासाठी त्या संशोधनाचा देशातील व परदेशातील संशोधकांनी आधार घेतला का, याचा आढावा एनआयआरएफने घेतला. तसेच विद्यापीठातील संशोधन चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी विद्यापीठाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले, याचेही परीक्षण केले. गुणात्मक शिक्षण देण्याबरोबरच संशोधन अधिक प्रमाणावर व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या तीन-चार वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वैैद्यकीय क्षेत्रात आधुनिक शिक्षणासाठी आम्ही आग्रही आहोत. आपल्याकडे सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची कमतरता आहे. विविध विषयांतील सुपरस्पेशालिटी डॉक्टर तयार करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील नवीन उपचारपद्धती, तसेच अत्याधुनिक उपकरणे हाताळण्यात यावीत, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षणातील गुणात्मकता वाढीस लागावी, तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण मिळावे, यासाठी स्वीडनच्या विद्यापीठाच्या माध्यमातून भारतातील काही विद्यार्थी स्वीडनला आणि स्वीडनचे काही विद्यार्थी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
विद्यापीठाला राज्यात पहिले मानांकन मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे भविष्यकाळात विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर संशोधन कसे होईल,
जागतिक पातळीवर विद्यार्थी आणि शिक्षकांचे संशोधन प्रकल्प सादर कसे होतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
महत्त्वाची बाब म्हणजे एनआयआरएफच्या यापुढील काळात होणाऱ्या सर्वेक्षणात विद्यापीठ देशातील २० संस्थांमध्ये कसे येईल, या दृष्टीने वाटचाल केली जाणार आहे.