समाजधर्म स्थापण्याची आवश्यकता
By admin | Published: January 21, 2016 12:57 AM2016-01-21T00:57:00+5:302016-01-21T00:57:00+5:30
ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली.
पुणे : ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली. खरेतर ज्ञान अंतरमनात, हृदयात असते ग्रंथात नाही. ज्यांनी ग्रंथ जाळले, त्यांना समलेले नाही. ही ज्ञानाची गंगा हजारो वर्षे प्रवाहित राहिलेली आहे. देश, संस्कृती, मूल्य, नैतिकता टिकविण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे. संकुचित भावनेने जाती, भाषांवरुन सुरू असलेली भांडणे दूर सारुन समाजधर्म स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
पुरोहितांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या सद्गुरू ग्रुपतर्फे सर्व वेदातील विशेष गुणवत्ताप्राप्त घनपाठी वैदिक आणि उच्च विद्या प्रवीण असणाऱ्या वैदिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात जोशी बोलत होते. जोशी आणि विश्वशांती केंद्र आळंदी माईस पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी जोशी बोलत होते. मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी राणे यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, दिवाकर गोरे, अपर्णा पाटील, मंदार शहरकर, प्रकाश दंडगे, अतुलशास्त्री भगरे व्यासपीठावर होते.
जोशी म्हणाले, ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे पुष्कळ असतील पण तेवढे पुरेसे नाही. विचारांचे आचरण करणारे श्रेष्ठ असतात. ज्यांचा सत्कार करण्यात आला ते आचरण करणाऱ्यांचे प्रतिक आहेत. वेदांना हजारो वर्षांची परंपरा आहे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होत आली आहे. अनेक आक्रमणे झाली तरी ती नष्ट झालेली नाही. आक्रमणांनंतरही देश उभा आहे. देशाने जगाच्या कल्याणाचाच विचार केला आहे. परंपरा काय आहे हे समजून घ्यावे.
प्रा. कराड म्हणाले, जात, पात, धर्माच्या नावाखाली सुरू असलेला विद्धंस थांबविला पाहिजे. जगाला सुखाचा, शांततेचा संदेश देणारा आपला देश आहे. २१वे शतक भारताचे असेल असे बोलले जाते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच संकेत आहेत, असे वाटते.
मंदार परळीकर यांनी परिचय करुन दिला. वैदेही शेटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)