नव्या स्थितीत समाजवाद शोधणे गरजेचे
By admin | Published: January 23, 2017 02:12 AM2017-01-23T02:12:54+5:302017-01-23T02:12:54+5:30
राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी संघर्षाला मूर्त स्वरूप दिले. नव्या परिस्थितीच्या आव्हानामध्ये समाजवादाचा
पुणे : राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी संघर्षाला मूर्त स्वरूप दिले. नव्या परिस्थितीच्या आव्हानामध्ये समाजवादाचा अर्थ काय, याचे उत्तर युवकांनी शोधावे आणि जातीयवाद, सांप्रदायिकता यांच्याविरोधात गावोगावी जाऊन संघर्ष करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शनिवारी येथे केले.
‘हम समाजवादी संस्थाएं’ या संघटनेतर्फे राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजावादी नेते भाई वैद्य, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संंघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे, ओडिशामधील युवानेत्या मनोरमा यांच्या हस्ते झाले. राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री सदाशिव मगदूम, ज्येष्ठ नेते जी. जी. पारीख, युसुफ मेहरअली युवा बिरादरीच्या गुड्डी, लोकायतचे निश्चय मात्रे व्यासपीठावर होते.
विविध नेत्यांनी आणि श्रोत्यांनी भाषणांदरम्यान भूकमारीसे आझादी, मनुवाद से आझादी, मोदीशाहीसे आझादी अशा घोषणा दिल्या. देशाच्या विविध भागातील कार्यकर्ते संमेलनासाठी उपस्थित आहेत. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे.
मनोरमा यांनी ओडिशामध्ये पोस्को कंपनीच्या जमीन अधिग्रहणाविरुद्ध दिलेल्या
लढ्याची व त्यासाठी झेललेल्या सरकारी अत्याचाराची कहाणी सांगितली.
गांधी, लोहिया, आंबेडकर यांचे समतेचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी लढा उभारावा, असे आवाहन त्यांनी केले. मगदूम यांनी प्रास्ताविक केले. मात्रे याने संमेलनाची रूपरेषा सांगितली. गुड्डी हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)