टेकडीवरील ‘त्या’ प्रकाराबाबत जनजागृतीची गरज; व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचेच, नागरिकांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:57 AM2024-02-27T09:57:11+5:302024-02-27T09:58:59+5:30
व्यसनाधीनता कमी करण्याबाबत वेळीच जनजागृती व्हावी; अन्यथा भावी पिढीचे प्रचंड नुकसान होईल, असा सूर सर्वांनी लावला आहे.
पुणे : ‘एआरएआय’ टेकडीवर दोन मुली बेधुंद अवस्थेत सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नागरिकांनी त्यावर दोन्ही बाजूने आपली मते व्यक्त केली. मुलींनी नशा केली असेल तर ती चूक आहे आणि त्यांचा व्हिडीओ व्हायरल करणे हे देखील चुकीचेच आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. व्यसनाधीनता कमी करण्याबाबत वेळीच जनजागृती व्हावी; अन्यथा भावी पिढीचे प्रचंड नुकसान होईल, असा सूर सर्वांनी लावला आहे.
मी एक मानसशास्त्रज्ञ आहे. नक्की काय घडलं हे जाणून न घेता आपली मतं व्यक्त करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलींचे चेहरे असे सोशल मीडियावर दाखवणे हे अतिशय बेजबाबदार कृत्य होते. इतर तरुणच मुलींना मदत करताना दिसले. हे ‘सो कॉल्ड’ जबाबदार नागरिक चित्रीकरणात व्यस्त होते. तरुणाई चुकीच्या मार्गाने जाताना दिसली तर त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करूया.
- वृंदा वाळिंबे, समुपदेशक
पुण्याच्या टेकड्या म्हणजे नशा आणि प्रेमाचे चाळे करण्याचे अड्डे झाले आहेत. पालकांना कर्जबाजारी करून मुले/मुली शहरात येत आहेत. पुण्यात सध्या नशेच्या वस्तूंचा बाजार मांडला आहे. टेकडीवरील व्हायरल व्हिडीओने हा प्रकार पुन्हा समाेर आला. गुन्हेगारी टोळ्यांचेही पेव फुटू लागले आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- लालचंद चोपडा, पुणे
परदेशात व्यसनी पदार्थांच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा दिली जाते. तसे झाले तरच देशाचे हित आहे. मुलांनीदेखील चुकीच्या मित्रासोबत मैत्री करू नये. पालकांनी आणि पोलिसांनीही लक्ष द्यावे.
- राजाभाऊ तिखे
आयटी क्षेत्रात काम करणारा कर्मचारी म्हणून मी एक सांगू इच्छितो की, या क्षेत्रात कर्मचाऱ्यांना कामावर घेताना तो कर्मचारी कंपनीसाठी किती उपयुक्त आणि फायदा करून देणारा आहे हेच पाहिले जाते. काही व्यसने आहेत का? हे पाहिलेच जात नाही. त्याचा परिणाम भाेगावा लागताे. मनुष्यबळ विभागाने यात लक्ष घालून नियमावली बनवली पाहिजे.
- निमिष सोनार, आयटी कर्मचारी
कॉलेजमध्ये व्यसन प्रतिबंधक कमिटी स्थापन करावी. जे व्यसनाधीन आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांना समजून घ्यावे. त्यांना यातून बाहेर काढावे. त्यासाठी प्रयत्न करावेत. पोलिस आणि प्रशासनानेदेखील यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
- जयमाला वाघमारे
टेकडीवरील मुलींचा जो व्हिडीओ व्हायरल झाला त्याचा बाऊ करू नये. त्या मुलींनी हे कृत्य करण्याआधी विचार नाही केला, उलट व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे लोकांना जाग तर आली. मुली लहान आहेत म्हणून दुर्लक्ष नको. अशाच लोकांमुळे पुण्यातील नवी पिढी खराब होत आहे. हे बाहेरून येतात आणि कसेही वागतात.
- रजनी कळसकर