बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन गरजेचे; बंद पडल्याने झाले मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:44 PM2022-02-02T13:44:34+5:302022-02-02T14:07:33+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले
-राहुल शिंदे
पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन शंभर चॅनल्स सुरू करण्याची घोषणा केली असून या चॅनल्ससाठी आता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपातील अभ्याससाहित्य तयार करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून यामुळे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे शक्य होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले असून देशात आता आधुनिक आंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत.तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण घेण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार आता महाराष्ट्रात बारा चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जाणकार व अभ्यासू मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बालचित्रवाणीकडे सर्वकाही उपलब्ध होते. मात्र,राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणीला टाळे लावण्याची वेळ आली. परंतु, कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतुद केलेली नाही. मात्र,शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. बालचित्रवाणी बंद झाली नसती तर महाराष्ट्राला चॅनलवर दाखविण्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओ तयार करणे सहज शक्य झाले असते. आता सर्वकाही नव्याने सुरू करावे लागणार आहे. मात्र, या चॅनेल्सवर दर्जेदार व्हिडिओ दाखवावे लागतील. त्याशिवाय विद्यार्थी हे चॅनल्स पाहणार नाही.
- डॉ.वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
केंद्र शासनाकडून मिळणा-या निधीवर बालचित्रवाणी ही संस्था सुरू होती. केंद्राकडून मिळणारा निधी बंद झाल्यानंतर राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणी बंद झाली. राज्यात प्रादेशिक भाषेतील 12 चॅनल्स सुरू होणार असल्याने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. बालचित्रवाणीकडे असणा-या जुन्या साहित्याचा वापर या चॅनल्ससाठी करता येऊ शकतो.
- एन.के.जरग, माजी शिक्षण संचालक