फेविपॅराविर व फॅबी फ्लू औषधांचा वापर वाढवण्याची गरज : डॉ. अमोल कोल्हे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:14+5:302021-04-18T04:09:14+5:30
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी शनिवार (१७ एप्रिल) रोजी लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरला भेट ...
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी शनिवार (१७ एप्रिल) रोजी लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. पूर्व हवेलीतील कोरोना रुग्ण व आरोग्य विभागाला येणा-या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार कोल्हे यांनी वरील आवाहन केले. यावेळी हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, लोणी काळभोर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय पवार, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण देसाई, तलाठी दादासाहेब झंजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.
रुग्णालयातील डॉक्टर व बाधितांचे नातेवाईक यांचेकडून रेमडिसिविर इंजेक्शनची मागणी मोठी आहे. ते उपलब्ध होत नसल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत. यामुळे या पुढील काळात वरील इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे डॉक्टरांनी सध्यातरी गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन द्यावे. रेमडेसिविर जीवनरक्षक नसले तरी याचा उपयोग शरीरातील विषाणूचा भार कमी होण्यासाठी होतो. यामुळे सध्या याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंजेक्शन उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध म्हणून फेविपॅराविर अथवा फॅबी फ्लू सुचविले आहे. यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शन वापराबाबत पूर्ण विचार करण्याची गरज आहे. शासनाने रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र रेमडेसिविरचा पुरवठा सुरुळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देण्याची गरज आहे. नागरिकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल काळजी व्यक्त करून खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, की हडपसरसह पूर्व हवेलीत गेले काही दिवसापासून बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या भागातील विविध रुग्णालयांत पुरेसे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध कसे करुन देता येईल याकडे लक्ष दिले जात आहे.
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांना माहिती देताना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव.