सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’ आवश्यक - विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:21 AM2017-11-06T05:21:41+5:302017-11-06T05:22:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असून त्यात जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असून त्यात जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते. संवादाविना लोकशाही बळकट होऊ शकत नाही. सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’सारखा संवादाचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी व्यक्त केले.
नवभारत निर्मिती संकल्प सिद्धी व भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून प्रसारित भाषणांवर आधारित ‘मन की बात’च्या मराठी अनुवादित पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्रबुद्धे, अनिल शिरोळे, आदी उपस्थित होते. विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, ‘मन की बात’ हा कार्यक्रम एका कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्यांशी केलेले हितगुज आहे. सामान्य लोकांकडून येणाºया सूचनांनुसार यामध्ये संवाद साधला जातो. खºया अर्थाने हा जनसंवाद आहे.