गडसंवर्धनासाठी चळवळीची गरज
By admin | Published: May 15, 2016 12:29 AM2016-05-15T00:29:15+5:302016-05-15T00:29:15+5:30
गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून एकूण गड-किल्ल्यांची संख्या सातशेच्या घरात जाते
नारायणपूर : गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून एकूण गड-किल्ल्यांची संख्या सातशेच्या घरात जाते आणि याचे श्रेय जाते ते स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांना. शिवकालीन गड-किल्ले हा आपला ऐतिहासिक ठेवा. आज अनेक गड-किल्ले जीर्णावस्थेत आहेत,.त्यांची पडझड झाली आहे. आता यापुढील लढाई ही गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची असेल, असे मत कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.
किल्ले पुरंदरवर सकाळी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुरंदर पंचायत समितीच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. संभाजीमहाराज यांच्या जन्माचा पाळणा या वेळी म्हणण्यात आला. पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मिरवणूक, भंडारा आणि दिवसभर विविध कार्यक्रमावेळी हजारो शंभूभक्त उपस्थित होते. राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी गौरव पुरस्कार’ सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुलींनी दोर, मल्लखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. ढाल -तलवार लढाईची प्रात्यक्षिके, कसरती मुलांनी करून दाखविल्या. संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. महाराजांच्या जयघोषाने किल्ला दणाणून गेला होता. ठिकठिकाणी संभाजीमहाराज यांच्या काळातील शस्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते, आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर पंचायत समिती सभापती अंजना भोर, पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश मुळीक, माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, पं. स. सदस्य दत्तात्रय झुरंगे, दिलीप यादव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बहुजन हक्क परिषेदेचे अध्यक्ष सुनील धिवार, राहुल पोकळे, विक्रम बोरकर, तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत, कार्याध्यक्ष सागर जगताप उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले की, छत्रपती संभाजीमहाराज यांनी पूर्वी नदीजोड प्रकल्पाचे काम केले आहे. आजपर्यंत महाराजांचे फक्त चारित्र्यहनन करण्याचे काम करण्यात आले आहे. संभाजीमहाराजांचा खरा इतिहास पुढे आणायचा असेल, तर युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. (प्रतिनिधी)