ऑक्सिजनच्या गरजेमुळे कोरोनाग्रस्तांचा रुग्णालयातील कालावधी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:57+5:302021-04-26T04:09:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासह ग्रामीण भाग व लगतच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी आधार असलेल्या, पुण्यात सध्या महापालिकेसह खासगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासह ग्रामीण भाग व लगतच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी आधार असलेल्या, पुण्यात सध्या महापालिकेसह खासगी रुग्णालयातही बेड मिळविणे कठीणप्राय झाले आहे. वेळेत निदान न करणे, आजार अंगावर काढणे आदी कारणांमुळे अनेक कोरोनाग्रस्तांना जास्त काळ रुग्णालयात काढावा लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत साधारणत: सात दिवस रुग्णालयात उपचारासाठी असलेला (गंभीर नसलेला) रुग्ण आता ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा दिवस देखरेखीखाली ठेवावा लागत आहे़
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १० हजार २०० कोरोनाबाधित उपचार घेत आहेत़ यामध्ये ६ हजार ५८१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर १ हजार ३६४ रूग्ण हे गंभीर आहेत. यापैकी सुमारे ६०० रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर अन्य व्याधी असलेले पण देखरेखीखाली ठेवणे जरूरी असलेले अन्य रूग्ण आहेत़
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खासगी रूग्णालयांना थेट मागणीनुसार व रूग्णाच्या नावानिशी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत असला, तरी महापालिकेच्या रूग्णालयांसह खासगी रूग्णालयांनाही आवश्यक तेवढे ही इंजेक्शन मिळत नसल्याची खंत आहे़ त्यातच महापालिकेला आपल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी दिवसाला साधारणत: पाचशे रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासते. परंतु, ही गरज पूर्ण होत नसल्याने खासगी वितरकांच्या भरोशावरच महापालिकेला रहावे लागत आहे़ दरम्यान महापालिकेने रेमडेसिविर इंजेक्शनकरिता खुल्यापध्दतीने निविदाही काढल्या, पण त्याला दहा दिवस उलटून गेले तरी अद्यापही कोणत्याही वितरकाने याकरिता निविदा भरलेल्या नाहीत़
--
चौकट १
शहरात रेमडेसिविर वगळता कोरोनाग्रस्तांना आवश्यक असलेली सर्व औषधे उदा. फेव्हीपिरॅव्हीर, टॉसिलीझूमॅप आदींचा आवश्यकतेनुसार साठा आहे़ परंतु, गेल्या आठवड्यात दोन दिवस ऑक्सिजन कमतेरतेमुळे हालाखीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली होती. सदुैवाने दोन दिवसांतच हा पुरवठा पूर्ववत होत गेल्याने मोठा अनर्थ शहरात टळला गेला़
--
चौकट २
रुग्णालयांतील बेड रिक्त झाल्यावर तुम्हाला बेड मिळेल असे उत्तर सध्या महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रूममधून तथा खासगी रुग्णालयांकडूनही मिळत आहे. रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांवरील उपचारांचा कालावधी वाढल्याने, नव्या रुग्णांना प्रवेश मिळणे कठीण बनत आहे़ त्यामुळे रुग्णालयात उपचारांची गरज असलेल्या कोरोनाबाधितांना बेड मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना सध्या अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत़
--
माझा चुलत भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्याला घरी होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता़ मात्र दोन दिवसांनी त्याची ऑक्सिजन पातळी ९२ वर आली़ त्यामुळे आम्ही महापालिकेच्या कोरोना वॉर रूमशी संपर्क साधला़ मात्र तेथे बेड उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कळविले जाईल असे सांगितले गेले़ परिणामी आम्ही इतर ठिकाणीही प्रयत्न सुरू केले़ पण सुदैवाने तीन तासांनी महापालिकेने जम्बो रुग्णालयात आम्हाला बेड उपलब्ध करून दिला़ परंतु, बेड मिळेपर्यंत आम्ही सर्व चिंतेत होतो़
- अमोल भंडारी, पुणे
----
कोट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांचा रिकव्हर होण्याचा कालावधी सात ते आठ दिवस होता़ मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रभाव बदलला गेल्यामुळे, अनेकांना ऑक्सिजनची सातत्याने गरज लागत आहे़ परिणामी त्यांची ऑक्सिजन पातळी पूर्ववत होण्यासाठी आज दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत आहे़ सध्या रेमडेसिविर इंजेक्शन वगळता अन्य सर्व आवश्यक औषधे ही शहरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत़
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका