दुर्लक्षित वारशांकडे लक्ष देण्याची गरज
By Admin | Published: April 18, 2017 02:30 AM2017-04-18T02:30:24+5:302017-04-18T02:30:24+5:30
युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे.
युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. त्यामुळे जागतिक वारसा दिनाच्या पार्श्वभूमीवर देगलूरकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
देगलूरकर यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्राचीन वारशांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यातील अनेक ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला आली आहेत. पर्यटकांचा ओढा त्या ठिकाणी वाढला आहे. अजिंठा, वेरुळ, कार्ला लेणी ही ठिकाणे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे बनली आहे. अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या वारशाकडे पुरातत्त्व विभागाकडून चांगल्या प्रकारे लक्ष दिले जात आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे पर्यटकांचा ओढा कमी आहे. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या ती मंदिरे, मशिदी, लेणी, गडकिल्ले, स्तूप, मनोरे खूप महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षांचा इतिहास या ठिकाणांमध्ये सामावलेला आहे. अशा वारशाचे चांगल्या प्रकारे जतन व्हावे, यासाठी शासनाने व स्थानिक लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
प्राचीन वारशाचे जतन करण्याची जबाबदारी शासनाची तर आहेच; मात्र त्याचबरोबर तिथल्या स्थानिक नागरिकांनीही त्यांचे काळजीपूर्वक जतन होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. पुरातत्त्व विभागाबरोबरच महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या स्थानिक पातळीवरील शासन संस्थांनी या वास्तूंचे योग्य प्रकारे जतन होईल, यावर भर द्यावा. काही दिवसांपूर्वी मी बहारिनला गेलो होतो. तिथे एका उजाड अशा ठिकाणी एक प्राचीन विहीर होती. त्या विहिरीच्या आजूबाजूला फारसे काही नव्हते. मात्र ती विहीर प्राचीन ठेवा असल्याने शासनाकडून अत्यंत काळजीपूर्वक तिचे जतन करण्यात आले होते. त्या विहिरीची देखरेख करणाऱ्या रखवालदारांसाठी वातानुकूलित केबिन उभारण्यात आल्या होत्या. त्या विहिरीची पडझड होऊ नये, यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. यावरून फारसा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांचे जतन करण्यासाठी बहारिन शासन किती दक्ष होते, याची कल्पना येते. त्याचप्रमाणे आपल्याकडेही पर्यटनप्रिय नसलेल्या प्राचीन वारशांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवा ठेवला आहे, याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना होण्यासाठी या वारशांचे जतन झालेच पाहिजे. जुन्या वास्तू, वाडे या अनेक वर्षांपूर्वीचे वास्तूशास्त्र कसे होते, याचा इतिहास उलगडून दाखवितात. जुनी मंदिरे, तिथली शिल्प हादेखील महत्त्वपूर्ण ठेवा आहे. सातवाहन काळातील तेर गावामध्ये अनेक जुनी देवळे आहेत. त्यातून गावाची प्राचीन परंपरा समोर येते. प्राचीन किल्ले, वास्तू, लेण्यांवर खडूने अथवा कोळशाने लिहून त्या विद्रूप करण्याचा प्रकार टवाळखोर पर्यटकांकडून केला जातो. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यामुळे फारशा प्रसिद्धीस न आलेल्या वास्तू पर्यटकांच्या समोर आणायच्या की नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे.
शालेयस्तरावरच मुलांना जागतिक वारसा जतन करण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमामध्ये प्राचीन वारसा जतन का केला पाहिजे, याची सविस्तर महिती दिली पाहिजे. अनेक जुन्या वाड्यांमध्ये खूप वर्षे
जुन्या वस्तू, शस्त्रे असतात. त्या वस्तूंचे चांगले संग्रहालय करून अधिक चांगल्या पद्धतीने त्या जतन करणे आवश्यक आहे.