ज्येष्ठ कलावंतांना मानधन द्यावे : लीला गांधी : १६ एमएम चित्रपट महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:45 PM2018-01-22T13:45:00+5:302018-01-22T13:48:37+5:30
ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली.
पुणे : ज्येष्ठ कलाकार जुन्या काळात खूप मेहनत करून आणि आपली कला दाखवून चित्रपट सृष्टीत नाव कमवत असत. पण कालांतराने त्यांना चित्रपटात कला सादर करणे अथवा नाटक करणे जमत नाही. अशा वेळी ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आम्ही पुणेकर आयोजित १६ एमएम चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार मोहन जोशी, एफआयसीसीआय चेअरमन आशिष कुलकर्णी, जयमाला इनामदार आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, समाजाने नेहमी सरकारवर अवलंबून राहू नये. सरकार हे जनतेसाठी असल्याने ते आपले कर्तव्य नेहमी करत असते. राज्यामध्ये अनेक कलाकारांना मानधन देण्याची योजना चालू केली आहे. जुने कलाकार परिस्थितीशी झगडून जीवन जगले. त्यांना मानधन मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल उचलले आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक साह्याची गरज असते, तर ते वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावेळी १६ एमएम चित्रपटासाठी ज्या तंत्रज्ञांनी आणि कलाकारांनी योगदान दिले, अशा लोकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आभार मानले.