छेडछाडीवर वचक बसेल, असा दंड हवा : चित्रा वाघ; धामणेत पीडित कुटुंबाची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:56 PM2017-12-16T12:56:58+5:302017-12-16T13:02:04+5:30
छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे ही चिंताजनक बाब आहे. छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
वाघ यांनी धामणे या गावातील अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास त्वरेने व्हावा, अशी मागणी केली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, उपाध्यक्ष हसीना इनामदार व अन्य महिला कार्यकर्त्या होत्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत पोलिसांमधील संवेदनशीलता वाढवण्याचा गरज आहे असे मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील गुन्हेगाराला नंतर न्यायालयात उपयोगी पडेल, असा पंचनामा व तपास केला जातो, असे त्या म्हणाल्या. कोंढवा येथील एका मुलीला मारहाण करण्याच्या प्रकारात बघ्यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ केला पण मध्ये पडून त्या मुलीला वाचवले नाही, यावरून समाजही संवेदनशीलता हरवत चालला असल्याचे दिसते आहे असे त्यांनी सांगितले.
महिला, मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीत समाज, पोलीस व सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी. पोलिसांकडे महिला दक्षता समित्या असतात, त्यातील महिलांना फक्त पंचनामा करण्यासाठी न वापरता पोलिसांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठीही वापरावे, असे मत वाघ यांनी व्यक्त केले. रेल्वे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य वाय-फाय केले जात आहे. त्यामुळे तरुणांकडून तिथे मोबाइलचा वाटेल तसा वापर केला जातो व त्याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळेच या धोरणाचाही फेरविचार व्हावा. कलमामधील बदल हे धोरण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधीमंडळात आवाज उठवतील, असे वाघ यांनी सांगितले.