मूळव्याधीविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज : सदानंद सरदेशमुख यांनी परिसंवादात व्यक्त केले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:08 PM2017-11-21T18:08:10+5:302017-11-21T18:11:16+5:30
जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.
पुणे : मूळव्याधीविषयी अजूनही लोकांमध्ये जागरुकता दिसत नाही. या आजारावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असून समाजामध्ये जनजागृती व्हायला हवी. या आजाराविषयी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे, असे मत सेंट्रल काऊन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनचे सदस्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी व्यक्त केले.
जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. नितीन बोरा, डॉ. धनराज गायकवाड, डॉ. नंदकुमार बोरसे, कर्नल संभाजी पाटील, अॅड. प्रताप परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाईल्स केअर या अॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सरदेशमुख म्हणाले, ‘मूळव्याध या आजाराच्या उपचारांविषयी असलेल्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी तपासल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.’
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, ‘मूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता दिसून येत नाही. त्यामुळे या आजाराकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्नपदार्थ, जंक फूड टाळले पाहिजेत. दैनंदिन जीवनात आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास अशाप्रकारचे आजार होणार नाहीत.’
डॉ. मिलींद भोई म्हणाले, ‘खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढले आहे. या आजाराविषयी जागृती होण्यासाठी लोकशिक्षण, लोकसभा अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.’ डॉ. नंदकुमार बोरसे म्हणाले, ‘बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. फळभाज्या, पालेभाज्यांचा अधिक वापर, डाळीचे पदार्थ कमी खाणे, ताक पिणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टींचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.’ यावेळी कर्नल संभाजी पाटील, शिवकुमार गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.