नदीच्या शुद्धीकरणासाठी आत्मदृष्टी हवी - डॉ. राजेंद्रसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:55 AM2018-04-16T01:55:58+5:302018-04-16T01:55:58+5:30
केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
आळंदी - केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह यांना पहिला पसायदान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी, त्या कामाला योग्य दृष्टीची जोड मिळाली नाही, तर ते काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी नदीवर प्रेम करणे, तिला समजून घेणे आवश्यक आहे. मी हाती घेतलेल्या नदी संवर्धनाच्या कार्यात कोणत्याही राजकारण्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि कोणत्याही कॉपोर्रेट कंपनीला पाण्याचा एकही थेंब दिला नाही. कारण नदीच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा असतो. समाजात ज्ञानाचा दीप लावून कार्र्य पुढे नेण्यासाठी आपण पसायदानाचे तत्व अंगीकारले पाहिजे.’
कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘आजच्या समाजातही दहशत आणि भितीचे वातावरण आहे. त्यात फारसा फरक पडलेलला दिसत नाही. ज्ञानेश्वरांप्रमाणे आजच्या काळातही कोणीतरी आशेचा किरण दाखविण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांची सुमारे शंभर साहित्य संमेलने होतात, ही अतिशय महत्त्वाची बाब असून हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.’
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्री आणि पुरूष असा भेद न करता आपण सगळे प्रकृती आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पंचतत्वांच्या मूळावर आज आपण घाव घालत आहोत. त्यातून आपण विनाशाकडे जात आहोत, असे वाटते. प्रकृतीच्या संवधार्नाचा, सृष्टीच्या संपन्नतेचा वारसा जपण्याचा निर्धार या संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.’
प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.