सत्य बोलण्याचे धाडस दाखविण्याची गरज : डॉ. गणेशदेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:50 PM2018-09-25T21:50:25+5:302018-09-25T21:55:57+5:30
आज देशातील प्रत्येक राज्य हे नागरिकांकडे जबाबदारी म्हणून नव्हे तर उत्तरदायित्व म्हणून बघत आहे. समाजात जे कुणी सत्य मांडू पाहात आहेत, त्यांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दडपला जात आहे.
पुणे : सध्याच्या आर्थिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषा, आवाज आणि विचारासमोर एकप्रकारचा धोका निर्माण झाला आहे, त्या धोक्याचा आपल्याला एकत्रितपणे सामना करायचा आहे. विचार हा भारतीय नागरिकरणाचा मुलाधार आहे. महात्मा गांधीजी यांनी दाखविलेल्या मागार्नुसार सत्य बोलण्याचे धाडस दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. विविधता लोकशाहीचा प्राण असल्याने विविधता आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दातं पेन इंटरनँशनल कॉंग्रेसचे भारतीय निमंत्रक आणि ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी देशभरातील लेखकांना आवाहन केले.
जगभरातील 80 देशातील 400 लेखक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुण्यात पहिल्या पेन साऊथ इंडिया इंटरनँशनल कॉंग्रेसला मंगळवारपासून सुरूवात झाली. माझे सत्याचे प्रयोग ही यंदाच्या पेन इंटरनँशनल कॉंग्रेसची संकल्पना आहे. या उदघाटन सोहळ्यामध्ये डॉ. गणेश देवी यांचे व्हाय पेन? व्हाय पुणे? याविषयावर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.
आगाखान पँलेस येथील कस्तुरबा गांधी यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन करीत शांततामय प्रार्थना करण्यात आली. पेन इंटनँशनल कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर सेलमेंट आणि संचालक कालर््स टोनर, सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार,सचिन ईटकर आणि सुनील महाजन उपस्थित होते.
पुण्यात जी मराठी भाषा बोलली जात आहे, त्याला 1500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. भारतीय भाषिक इतिहासाचा आढावा घेतला तर इतर भाषांबरोबरच मराठीने देखील सक्षमपणे प्रतिनिधित्व केले आहे. आज पेन कॉंग्रेसमध्ये जे 80 देश सहभागी झाले आहेत त्यामाध्यमातून 4000 भाषा प्रतिनिधित्व करीत आहेत. या भाषांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आपण एकत्रितपणे उभे राहाण्याची आवश्यकता आहे, असे सांगून डॉ. गणेश देवी म्हणाले, आज देशातील प्रत्येक राज्य हे नागरिकांकडे जबाबदारी म्हणून नव्हे तर उत्तरदायित्व म्हणून बघत आहे. समाजात जे कुणी सत्य मांडू पाहात आहेत, त्यांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दडपला जात आहे. आज जगभरामध्ये विचारवंत आणि पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत. त्या हल्ल्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. एक नव्या प्रकारचा हिंसक समाज निर्माण होत आहे. त्याच्यामागे अपरिमित लोभ असलेली अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. मात्र यातून बाहेर निघायचे असेल तर त्याचे प्रत्युत्तर द्वेषाने किंवा घृणेने देता येणार नाही तर ते प्रेमानेच द्यावे लागेल. या पेन इंटरनँशनल कॉंग्रेसच्या माध्यमातून प्राचीन भारतीय स्वातंत्र्य पुन्हा आणण्याची संधी मिळाली आहे. जे सांगत आहे की संपूर्ण जग हे माझं असले तरी ते माज्या मालकीचे नाही तर मी त्याची मालकी आहे.
डॉ. शां.ब मुजुमदार आणि कार्ल्स टोमनर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
...............
भारतात पेन इंटरनँशनल कॉंग्रेस होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याबरोबरच लुप्त होणा-या भाषांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे हा या पेन इंटरनँशनल कॉंग्रेस आयोजनाचा हेतू आहे. पहिली महिला अध्यक्ष झाल्याचा आनंद नक्कीच वाटत आहे. विविध परिषदा, संवाद, व्याख्यानाच्या माध्यमातून हेच सातत्याने मांडत आलो आहोत की महिलांचा अधिकार हा धर्म, संस्कृतीपेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे.सध्याच्या काळात सत्य मांडणे हे खूप आवश्यक आणि आव्हानात्मक बनले आहे. पेन इंटरनँशनल कॉंग्रेसच्या माध्यमातून एकत्रितपणे विविधतेचा आवाज मांडला जात आहे- जेनिफर सेलमेंट, अध्यक्ष पेन इंटरनँशनल कॉंग्रे