स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे : डॉ. महेश गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:52+5:302021-05-12T04:09:52+5:30
पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची (रविकिरण सासवडे) बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच ...
पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची
(रविकिरण सासवडे)
बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच भविष्यातील कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करू शकतो. स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे आहे. तरच यापुढे आपण स्थानिक अन्नसाखळी मजबूत ठेऊ शकतो, असे मत बारामती येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
‘कोरोना साथरोग जैवविविधता आणि मानवी जीवनशैली’ याबाबत ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, आपल्या अवतीभोवती असणारी वड, उंबर, पिंपळ, पळस, पांगारा, काटेसावर, जांभूळ, बाभूळसारखी बहुपयोगी वृक्षसंपदा वाढवणे गरजेचे आहे. कारण यात जीवनदायी व वटवृक्ष असे या वृक्षांना संबोधले जाते. कारण जैवविविधतेत हे वृक्ष लाखो जीवांना जीवदान, आहार, निवारा देत असतात. शिवाय दिवसभर मोठ्या प्रमाणात प्राणवायू देत असतात. निसर्गातील वनस्पती नियमानुसार प्राणवायू फक्त दिवसा देतात. मात्र, आपल्या संस्कृतीत तुळस २४ तास प्राणवायू देते असे सांगतात. समुद्रातील अनेक छोट्या पाणवनस्पती जास्त प्राणवायू देतात. यात जमिनीवरील झाडांचा खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. विशेषत: जमिनीवरील वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे, कारण जर झाडे नसतील तर पृथ्वीवर एकही जीव जगणार नाही, हे शास्त्र सांगते. ऑक्सिजननिर्मिती होताना समुद्रापासून सुरुवात झाली आणि आता यात मोठा वाटा जमिनीवरील हिरवाईचा आहे. याकडे माणसाचे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासारखी महामारी आपल्याला कधीही आवरता येणार नाही, हे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.
शहरात तर ८० टक्केपेक्षा जास्त परदेशी झाड लाऊन आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडे, गवत, झुडपे, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाड सर्वकाही नष्ट करून त्याजागी परदेशी झाड लावली. जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन वायू हा फक्त हिरव्या वनस्पती निर्माण करू शकतात, याची जाणीव करून देणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. ज्या भागातील स्थानिक जैवविविधता जास्त प्रमाणत बळकट असेल त्या भागातील सर्व जीवांच्या जगण्यातील आनंद व समाधान जास्त असते. किफायतशीर, सहजीवन, पर्यावरणपूरक, निसर्ग संतुलितपणा अशा अनेक पैलूंचा विचार करता, स्थानिक वृक्षसंपदा अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यातील आपली जीवनशैली आरोग्यदायक ठेवण्यासाठी डोळसपणे निसर्गाकडे पाहण्याची व त्याला वाचवण्याची.
ज्या देशाची जैवविविधता बळकट आहे, तिथे कोरोना हाहाकार कमी आहे. अगदी भूतानसारखा गरीब देश मात्र कोरोनावर जवळपास त्यांनी विजय मिळविला आहे. अर्थात भूतानचे जंगल हे जवळपास ७० टक्के एवढे आहे, देशाच्या भूभागांपैकी. अर्थात भूतान हा झीरो कार्बन असलेला एकमेव देश, जिथे एकही कारखाना नाही. मात्र, जगातील सर्वांत जास्त आनंदी व समाधानी देश अशी ओळख आहे.
---------------------