संगीतातील विविध छटांचा अभ्यास करण्याची गरज : डॉ. सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:43+5:302021-02-08T04:10:43+5:30
पुणे: ‘गाणं’ हे माणसात उत्स्फूर्त असते. त्यातूनच लोकसंगीताचा जन्म झाला. या संगीताचा गांभीर्याने विचार करत त्याला एका शास्त्रीय चौकटीत ...
पुणे: ‘गाणं’ हे माणसात उत्स्फूर्त असते. त्यातूनच लोकसंगीताचा जन्म झाला. या संगीताचा गांभीर्याने विचार करत त्याला एका शास्त्रीय चौकटीत बांधल्यानंतर शास्त्रीय संगीत पुढे आले. संगीतातील या वेगवेगळ्या छटांमध्ये कायमच देवाणघेवाण सुरु असते. परंतु या सगळ्याचा आजवर कोणी नीट अभ्यास केलेला नाही. तो होणे आवश्यक आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'अभिवादन' कार्यक्रमात (दि. ७) साहित्य, चित्रपट व रंगचित्र या माध्यमातील दिग्गजांनी पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला. यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे व पंडितजींचे चिरंजीव आणि प्रसिध्द रंगचित्र तज्ञ जयंत जोशी सहभागी झाले होते. त्यांच्याशी लेखक, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी संवाद साधला.
संत साहित्य, भजने, लोकसंगीत व शास्त्रीय संगीताशी पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीच्या सांगड घालत मोरे म्हणाले, ‘बालगंधर्व’ हे नाव आपल्याला नाट्य संगीतासाठी माहिती आहे. मात्र त्यांच्या उत्तर काळात त्यांनी असंख्य भजने गायली आहेत. त्या अर्थाने भजनांना शास्त्रीय ढंगात गाण्याचे काम प्रथम बालगंधर्वांनी केले. तोच वारसा पंडितजींनी पुढे चालवत अभंगवाणीद्वारा त्याला विस्तृत रूप दिले. कुमार गंधर्वांची भजन गायकी ही निर्गुणी पद्धतीची होती. कारण ती गायकी बाहेरून अंतर्मनात शिरते तर पंडितजींची गायकी सगुणी आहे असे वाटते. कारण आतला निर्गुण निराकार भगवंत ते बाहेर आणत त्याला आपल्यासमोर सगुण साकार करतात.
चित्रपट, देहबोली आणि पंडितजींच्या गायकीविषयी सांगताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अण्णांना गाताना बघताना असं नेहमी जाणवायच की त्यांच्या आत प्रचंड तळमळ आहे. त्यांना काहीतरी गाठायचे आहे, मिळवायचे आहे . त्यांचे आंतरिक भाव त्यांच्या देहबोलीतून बाहेर प्रकट होत. त्यामुळे त्यांना गातांना बघणे हा म्हणजे एक सौंदर्यानुभव असल्याची प्रचिती यायची. माजी मुख्यमंत्री वसंत पाटील हे मुख्यमंत्री असताना पंडितजींवर माहितीपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंडितजींचे सानिध्य अधिक लाभले. त्यावेळचे त्यांचे वाक्य आठवते, ते म्हणायचे, रियाज हा रियाज असतो, मैफल ही मैफल असते. मैफिलीत रियाज करू नये. ही बाब कोणत्याही कलेसाठी अगदी लागू पडते.
जयंत जोशी म्हणाले, संगीत ही स्वयंभू, परिपूर्ण कला आहे. यात तुम्ही तल्लीन झालात तरच गाणं रंगते. घरात खूप तेजस्वी गाणं होतं. वडिलांना वायाच्या ९ व्या वर्षीच आयुष्याचे ध्येय सापडले होते. बाबा म्हणत शरीर हे गाण्याचे वाद्य आहे. आणि ते त्याची तशी काळजीपण घेत. त्याचं गाणं फार प्रामाणिक होतं.