बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज : डॉ. सदानंद मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 07:07 PM2019-11-22T19:07:30+5:302019-11-22T19:08:23+5:30
बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार
पुणे : बालसाहित्य लिहिणारे फार कमी लेखक आहेत. कारण बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार आहे. लहान मुलांसाठी लिहिताना काल्पनिकतेबरोबरच वास्तवाचे देखील भान असावे लागते. बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, आपणही लहान होतो. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मत राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
रोहन प्रकाशनातर्फे आयोजित कार्यक्रमात बालसाहित्यिकार स्वाती राजे लिखित ‘अंधाराचं गाव’,‘पूल’ आणि ‘शोध’ या कथांच्या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाती राजे, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, ‘किशोर’ नियतकालिकाचे संपादक किरण केंद्रे, छात्र प्रबोधनचे महेंद्र सेठिया, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, बालसाहित्याला स्वाती राजे यांनी नेहमी केंद्र्रस्थानावर ठेवले आहे. त्यांनी सहज आणि सोप्या पद्धतीत बालसाहित्याचे लेखन केले आहे. आपण सगळ्यांनीच बालसाहित्य आणि भाषा धोरणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
किरण केंद्रे्रे यांनी बालवयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. बालसाहित्यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत. लेखक कितीही मोठा असला तरी त्याने मुलांसाठी लिहिताना नेहमी बालवयात शिरूनच लेखन केल पाहिजे, असे सांगितले.
स्वाती राजे म्हणाल्या, जगभरात भटकंती करत असताना जे साहित्य दिसले ते आपल्याकडे का नाही, याची सातत्याने खंत वाटते. आपल्या समाजातून बालसाहित्यकार म्हणून एक पिढी पुढे आली का? असा प्रश्नही पडतो. बालसाहित्याचा फारसा गांभीर्याने अभ्यास झालेला नाही. याविषयी केवळ खंत व्यक्त न करता नवे प्रयोग बालसाहित्यात आणण्याचा प्रयत्न मी करते आहे.
यावेळी स्वाती राजे यांनी आपल्या ‘पूल’ या पुस्तकाचे वाचन केले.
छायाचित्र ओळी - बालसाहित्यिका स्वाती राजे लिखित पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी डॉ. सदानंग मोरे, (डावीकडून) चंद्रमोहन कुलकर्णी, रोहन चंपानेरकर, किरण केंद्रे, डॉ. मोरे, महेंद्र सेठिया, स्वाती राजे आणि राजेश भावसार.