भावी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षणपद्धती हवी : डॉ. माणिकराव साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:52 PM2017-12-28T15:52:23+5:302017-12-28T15:57:21+5:30
शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल', असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
पुणे : 'शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल', असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मानचे वितरण डॉ. साळुंखे यांच्या हस्ते गुरुवारी झाले, यावेळी ते बोलत होते. गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे पुण्याचे विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी, ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख सुवर्णा गोखले, मुकेश माचकर, सिनर्जी हॉलिडे व्हिलेज यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, सारिका रोजेकर आणि सचिन सूर्यवंशी उपस्थित होते .
डॉ. पी. ए. इनामदार या वेळी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, 'सध्याची शिक्षणपद्धती ही डाव्या मेंदूला कामाला लावणारी आहे, मात्र, संशोधनासह अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी उजवा मेंदू वापरला जाणे आवश्यक आहे.
काळ बदलत असून, नव्या पिढीसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहत आहेत. अशा वेळी आगामी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षण पद्धती निर्माण करावी लागेल. सर्वांना प्रगतीची समान संधी दिली तरच देशाची प्रगती होईल.
डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान डॉ. व्ही. एन. जगताप, आणि खतीब अजाझ हुसेन यांना देण्यात आला. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले.