युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Published: May 13, 2017 04:18 AM2017-05-13T04:18:22+5:302017-05-13T04:18:22+5:30

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार

The need to turn towards sustainable farming by youth power | युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

Next

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे झपाट्याने वळत असलेले पाहायला मिळत आहे. यातून देशात सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. या युवाशक्तीला शाश्वत शेतीकडे वळविण्यात यश मिळाल्यास देशातील लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. यातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे सांगितले होते. याचा हेतूच हा होता, की शेतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती व्हावी. नेहरू युवा केंद्रातर्फे ग्रामीण भागातील युवकांना युवा मंडळांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवळपास ३०० ग्रामीण युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ आम्ही इंदापूर तालुक्यातून केला होता. पदवीधर युवकांना मोफत १०० तासांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
आम्ही मुळातच ग्रामीण भागातील युवकांच्या विकासासाठी काम करीत असतो. त्यामधून समाजात एकता टिकून राहावी, यासाठी विविध समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी सामूहिकरीत्या साजऱ्या करतो. आतापर्यंत या विभागाच्या वतीने मतदार जनजागृती, वसुंधरा दिन, लोकशाही दिन, पर्यावरण दिन, जागतिक एड्स दिन, संविधान दिन यासारखे उपक्रम युवा मंडळांना बरोबर घेऊन साजरे केले आहेत. यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती घडून येते. नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील तालुकानिहाय युवकांना निवडून त्याना ५,००० रुपये मानधन दिले जाते. या युवकांना समाजात सन्मानाने जगण्याची कला दोन वर्षांत शिकवली जाते. आज आमच्या विभागातून बाहेर पडलेले युवक मोठ्या पदांवर काम करतात. तर काहींनी राजकारणात चांगली प्रगती केली आहे. ‘स्वत:साठी नाही, तर समाजासाठी जागा’ अशी शिकवण आमच्याकडे या युवकांना दिली जाते. दोन वर्षे तयार करून या युवकांना समाजात काम करण्यासाठी सोडून दिले जाते. नेहरू युवा केंद्राकडून ८० टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. जेणेकरून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी विविध प्रशिक्षण, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजच्या युवकाने शेतीचे परिपूर्ण ज्ञान घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करून स्वत: यशस्वी व्हावे.
नेहरू युवा केंद्राकडून युवकांना युवा समुदाय कार्यशाळा, कौशल्यविकास कार्यशाळा, क्रीडा प्रोत्साहन कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रम, राष्ट्रीय युवा धोरण यासारखे कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये संघटन निर्माण झाले, तर समाजाचा विकास होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, समाजात सर्वधर्मसमभाव निर्माण होणे गरजेचे आहे. नेहरू केंद्राकडून गावागावांतील प्रत्येक तरुण गावागावांत असणाऱ्या प्रत्येक समितीमध्ये तरुणांना स्थान मिळवून देण्याचे काम युवा केंद्रामार्फत केले जाते. आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने काहीसा समाजापासून दूर जाऊ लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने त्याचे समाजातील स्थान कमी होऊ लागले आहे. विकसित राष्ट्रांमध्ये चीन, अमेरिका, जपानसारख्या देशांमधील युवकांना विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे दिले जातात. त्यामुळे ते देश आज उच्च स्थानावर विराजमान आहेत. त्या ठिकाणी बेरोजगारी अस्तित्वात राहिलेली दिसत नाही.
तसेच, आपल्या देशातील युवकांनाही विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे मिळाल्यास ते स्वत:चा उदरनिर्वाह स्वत: भागवू शकतात याची त्यांना जाणीव होईल. याचा फायदा होऊन आपल्या देशात अथवा राज्यात असणारी बेरोजगारी हटण्यास मोठी मदत होईल.

Web Title: The need to turn towards sustainable farming by youth power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.