समाजाच्या प्रगतीत ‘ती’चा सन्मान आवश्यक- नयना गुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:01 AM2018-09-16T02:01:57+5:302018-09-16T02:02:16+5:30
‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी व्यक्त केली.
समाजात महिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ वेगवेगळ्या रूपांत येते. आई, पत्नी, मैत्रीण, बहीण, शिक्षिका अशा विविध रूपांमध्ये ती असते. त्यामुळे ‘ती’ समाजाच्या प्रगतीतील अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तिला महत्त्व देणे आवश्यक असून त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून करायला हवी. सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘ती’ला मानाचे स्थान द्यायला हवे. त्या दृष्टीने ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सव तसेच अन्य सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याचे प्रमाण कमी आहे. घरांमधील सर्व सण-उत्सवांमध्ये महिला अग्रभागी असतात; पण सार्वजनिक ठिकाणी त्यांना दुजाभाव मिळतो. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. कारण समाजातील महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला अनेक क्षेत्रांत पुढे जात असल्या तरी त्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पण, निसर्गानेच महिलांच्या खांद्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्या पेलण्यासाठी महिला सक्षम आहेत. त्याचबरोबर इतर जबाबदाºया पेलण्यासाठीही त्या पुढे येत आहेत. त्यांना समाजाकडून प्रोत्साहनाची गरज आहे. ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. सर्व महिलांनी एकत्रित येऊन एक आदर्श घालून दिला आहे. इतरांनीही या उपक्रमाचे अनुकरण करून महिलांना मानाचे स्थान द्यायला हवे.
शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. राजकारण, शासकीय नोकºयांमध्येही महिलांना आरक्षण आहे. पण, हे प्रयत्न एवढ्यापुरतेच मर्यादित नकोत. महिलांसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी महिला त्यांच्या परीने प्रयत्न करीतच असतात; पण त्यांना समाजाच्या मदतीची, प्रोत्साहनाचीही गरज आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे स्थान महत्त्वाचे आहे. हे स्थान त्यांचा सन्मान करून आणखी बळकट करायला हवे. ‘ती’च्यासाठी ‘त्या’चा मदतीचा हात पुढे यायला हवा. दोघांमध्ये मनमोकळा संवाद घडून आल्यास समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल. महिलांना पुढे जाताना पाहायचे असेल, तर त्यात दोघांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. आपण महिलांचा जेवढा मान राखू, तेवढाच मान त्यांच्याकडूनही मिळेल.
सध्या महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच ‘ती’ या जबाबदाºयाही सक्षमपणे पेलत आहे. पण तरीही नैसर्गिकपणे तिच्यावर आलेल्या काही जबाबदाºयांना अनेक मर्यादा येतात. त्याचा परिणाम तिच्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीवर होत असतो. पण, अनेक महिला त्यावरही मात करून पुढे जात आहेत. काही महिलांनी केवळ कौटुंबिक जबाबदारीच स्वीकारली आहे. महिलांचा ओढाही कुटुंबाकडे अधिक असतो. समाज सुदृढ होण्यासाठी हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरामध्येही महिलांना मानसन्मान मिळायला हवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे भान प्रत्येकाला असायला हवे. नोकºयांमध्येही अनेकदा महिलांना कमी लेखले जाते. त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाºया दिल्या जात नाहीत. त्यांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते; पण महिला अधिकाºयांनी स्वत:हून पुढाकार घेतला तर अशा महत्त्वाच्या जबाबदाºयाही त्यांना मिळतात. माझ्यासह अनेक महिला अधिकारी महत्त्वाची पदे सक्षमपणे सांभाळत आहेत. अनेक महिलाही स्वत:हून ही पदे नाकारतात. तसे न करता महिलांनी एक आव्हान म्हणून अशा संधी सोडू नयेत. प्रत्येक क्षेत्र महत्त्वाचे आहे.
महिला अनेक आव्हाने स्वीकारत आहेत. त्यांना आता समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कोणताही सण-उत्सव केवळ निमित्त असते. ‘लोकमत’ने या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना ही संधी दिली आहे. अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी, त्यांना योग्य मान देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. ‘ती’ला सन्मान दिला, तरच समाजाची प्रगती होईल. यासाठी ‘त्या’चे योगदान महत्त्वाचे आहे.