पुण्याला प्रदूषणमुक्त करायचे असेल तर पर्यावरणपूरक बस सुरू होणे गरजेचे : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:18 PM2018-01-01T19:18:54+5:302018-01-01T19:22:00+5:30
जागतिक मराठी अकादमीतर्फे 'शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले.
पुणे : मराठी तरुणाला विकासाची दिशा देण्याचे काम विविध पातळ्यांवर होत आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी जास्तीत जास्त तरतूद करण्यावर भर दिला जाणार आहे. तंत्रज्ञान बदलत असताना गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी पिकवून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. पिकांचे बायो सीएनजी, बायो इथेनॉलमध्ये रुपांतर झाल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतात. पुण्याला प्रदूषणमुक्त करायचे असेल तर पर्यावरणपूरक बस सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
जागतिक मराठी अकादमीतर्फे 'शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. विजय जोशी, ज्येष्ठ कवी आणि वात्रटीकाकार रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष हणमंत गायकवाड, प्रमुख संयोजक सचिन ईटकर आदींसह मधु मंगेश कर्णिक, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष डॉ. विजय जोशी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅस्ट्रेलियात आले, तेव्हा हे विमानतळ मराठी माणसाने बांधले, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. त्याक्षणी मराठी माणूस असल्याचा अभिमान वाटला. आजवरच्या कारकिर्दीत हार मानायची नाही, हा मंत्र कायम जपला. ज्या देशात लहानाचा मोठा झालो, त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही.'
यशवंतराव गडाख यांनी प्रास्ताविक केले. पी. डी. पाटील, हणमंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.