पुण्यातील पोलीस चौकीतील मृत्यूच्या चौकशीची नीलम गोऱ्हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 04:16 PM2018-05-09T16:16:11+5:302018-05-09T16:16:11+5:30
पुण्य्यातील जनवाडी पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी बोलाविलेल्या तरुणाला पोलीस उपनिरीक्षकांनी मारहाण सुरू केली.
मुंबई - पुण्य्यातील जनवाडी पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी बोलाविलेल्या तरुणाला पोलीस उपनिरीक्षकांनी मारहाण सुरू केली. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या वडिलांना धक्का बसला व त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची व दोषींवर कारवाईची मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुण्यातील जनवाडी पोलीस चौकीमध्ये अमोल मेंगडे यास एका प्रकरणात पोलिसांनी 6 मे रोजी रात्री 8.30 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक डोणपिसे यांनी मोरेश्वर मेंगडे यास मारहाण सुरू केली. ते पाहून त्याचे वडील मोरेश्वर मेंगडे यांना धक्का बसला व त्यांचे तेथेच निधन झाले. मोरेश्वर मेंगडे यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणी मी संबंधित परिवाराची मंगळवारी भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. त्या भेटीत कुटुंबियांनी जबाबदार पोलीस अधिकाऱ्र्यांवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच मी अधिवेशनात त्यावर आवाज उठवावा ही विनंती केली.
मी प्रत्यक्ष भेटीत उपस्थित पोलीस अधिकारी दयानंद ढोमे यांना अमोल मेंगडे यांची तक्रार घेऊन त्वरीत कार्यवाही करण्याची गरजही निदर्शनास आणून दिली. त्या आधी जनवाडी परिसरातील सर्वपक्षीय शिष्टमंडऴाने माझी भेट घेऊन जनवाडी पोलीस चौकीतील बेफिकीरी व वाईट वर्तनाच्या अनेक घटनांची माहिती दिली.
यावेळी बाळासाहेब चव्हाण, मनोहर जाम्बवन्त, राजन नायर, विनोद गोयल, विकास डाबी, विशाल कुसालकर, मयुरी शिंदे, अल्ताप मिरजादे, सचिन इंगले, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे, सचिन ताथवडेकर, शंकर पवार, अमजद खान, बाबा सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, युवक क्रांती दल, मनसे व छावा आदी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
त्यानंतर दयानंद ढोणे व संपूर्ण पोलीस स्टेशन कर्मचारी अमोल मेंगडे यांच्या घरी आले व अमोलच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस अधिकारी डोणपिसे यांची बदली करण्यात आली अाहे. कडक कारवाईची शिफारस करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र आपण वरिष्ठ स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही वाचवण्याच्या फंदात न पडता नीट पुरावे जमा करणे गरजेचे आहे, याकडे मी आपले लक्ष वेधत आहे. पोलीस चौकीतच मरण येते, अशावेळी पोलिसांनी त्याबाबत काय चौकशी केली व महत्वाचे म्हणजे या घटनेत स्पष्ट दिसते त्या प्रमाणे मांडवलीसाठी पोलीस चौकीचा दुरूपयोग झालेला आहे. हे अतिगंभीर असून ही पोलीस खात्याला लागलेली कीड दुरूस्त करण्यास आपण लक्ष घालावे, असेही गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील चतु:श्रुंगी कार्यालयस्थित रिक्त असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्तपद तातडीने भरणे गरजेचे आहे, असेही गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
आर्थिक मदतीची मागणी
सदर घटनेतील मारहाणीला पाहूनच मोरेश्वर मेंगडे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची तब्बेत चांगली होती. या आकस्मिक मृत्यूबद्दल आपण शासनातर्फे मेंगडे परिवारास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे डोणपिसे यांची बदली पुरेशी नाही. त्यांनी २ दिवसांत चौकशी करून बडतर्फ करण्यात यावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे.