नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम सुरू मात्र, सुरक्षा वाऱ्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:07 AM2018-05-07T03:07:48+5:302018-05-07T03:07:48+5:30
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाही.
पळसदेव - नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाही. मागील पाच महिन्यांपूर्वी अकोले येथे क्रेनचा वायररोप (दोर) तुटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील काम काही महिने बंद होते. पुन्हा हे काम सुरू झाले आहे. मात्र अजूनही सुरक्षिततेच्या उपाययोजना पुरेशा दिसत नाहीत. भादलवाडी येथे चालू असलेल्या कामाची पाहणी केली असता, अनेक त्रुटी जाणवल्या. बोगद्यामध्ये क्रेनद्वारे कामगार उतरविताना क्षमतेपेक्षा अधिक कामगारांना क्रेनच्या ‘बकेट’मध्ये बसवून उतरविले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे या परप्रांतीय कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी कोण घेणार? हजारो कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. काम चालू असताना त्या ठिकाणी कंपनीचा कोणीही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. सुरक्षारक्षक व इतर कामगार काम करीत होते. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच क्रेनचे वायररोप (दोर) वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.