नीरा देवघर-भाटघर पाणीसाठ्यात घट
By admin | Published: May 12, 2014 03:30 AM2014-05-12T03:30:06+5:302014-05-12T03:30:06+5:30
या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे.
भोर : या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी-कमी होतोय. त्यामुळे दोन्ही धरणभागांतील गावात पाणीटंचाई वाढत आहे. नीरा देवघर धरणात ३० टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर भाटघर धरणात ८.५९ टक्के २ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी धरणाचा पाणीसाठ्यात घट झाली आहे. वीर धरणात ३४.४३ टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय भोरमधील तिन्ही धरणांचे पाणी नदीद्वारे वीर धरणात जात आहे. भाटघर धरणातील वीजनिर्मिती केंद्र डिसेंबरला सुरू झाले. दोन महिन्यांत पाण्याअभावी बंद आहे. नीरा देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र आॅक्टोबरला सुरू झाले, त्यात अजून १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघरला १६ तर नीरा देवघरला ६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. पूर्वभागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून या वेळी दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडले आहे. यामुळे पूर्व भागाची तहान भागत असली तरी भोरमधील धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नीरा देवघर व भाटघर धरण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. विशेषत: भाटघर धरणात २४ पैकी फक्त २ टीएमसी पाणीसाठाच शिल्लक आहे. त्यातही निम्मा गाळ आहे. अद्यापही धरणातून पाणी सुरू राहिल्यास अत्यल्प पाणीसाठा राहून धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. धरणाच्या पाण्यावर अनेक नळपाणीपुरवठा योजना आहेत. धरणाचे पाणी कमी झाल्यावर विहिरींनाही पाणी कमी पडते आणि टंचाई भासते. त्यामुळे भाटघर धरणातील पाणी सोडणे बंद करायला हवे, अशी मागणी होत आहे.