नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक
By Admin | Published: August 6, 2016 12:52 AM2016-08-06T00:52:21+5:302016-08-06T00:52:21+5:30
गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत
सोमेश्वरनगर : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व शाळा क्र. २मध्ये गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने ३१ आॅगस्टपर्यंत याकडे लक्ष न दिल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा नीरेचे उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह १० सदस्यांनी दिला आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व २ या शाळांमधून सुमारे ७०० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही २० शिक्षकी शाळा असून पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी प्राथमिक शाळा आहे. मात्र, प्रशासन या शाळेकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्याने ७०० मुलांना जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. आज नीरेतील ग्रामस्थ, ग्रामपंचयात सदस्य व शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी अचानक शाळेची पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक परिस्थिती पुढे आली. या शाळेमध्ये एकूण २५ वर्गखोल्या आहेत. यातील १० ते १२ वर्गखोल्यांचे छत गळत आहे. काही वर्गखोल्यांमधून तर चक्क पाणी भरले आहे. मुलांना पाण्यामध्येच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचा वरील मजला पूर्णत: खिळखिळा झाला आहे. स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. बिम वाकले आहेत. तसेच पूर्णत: बांधकाम झुकले आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. वास्तविक या शाळेची जागा नीरा ग्रामपंचायतीची आहे. जिल्हा परिषद नीरा ग्रामपंचायतीला दर महिन्याला २३ हजारप्रमाणे वर्षाला ३ लाख रुपये भाडे देते. मात्र, हे भाडे ५ वर्षापासून दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेकडे १५ लाखांच्या आसपास भाडे येणे असल्याने या शाळेची डागडुजी होऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेने याची डागडुजी करत न बसता नवीन इमारत बांधावी अशी मागणी होत आहे. या वळी उपसरपंच दीपक काकडे म्हणाले, जिल्हा परिषद व राज्य सरकार या शाळेत शिकणाऱ्या ७०० मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे. या वेळी नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, उपसरपंच दीपक काकडे, सदस्य बाळासाहेब भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे राधा माने, सुदाम बंडगर, सतीश गालिंदे, अप्पा दारोळे, हरिभाऊ जेधे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
>शाळेची एवढी दयनीय अवस्था झालेली असतानाही याकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे. त्यामुळे या शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.
तसेच याबाबत ३१ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा काकडे यांनी दिला आहे.