नीरेत ‘बीएचआर’चा ठेवीदारांना गंडा
By admin | Published: June 28, 2015 12:07 AM2015-06-28T00:07:20+5:302015-06-28T00:07:20+5:30
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातही भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी- स्टेट-को- आॅप. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातही भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी- स्टेट-को- आॅप. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सोसायटीच्या संचालक मंडळ आणि स्थानिक सल्लागार मंडळाच्या विरोधात ठेवीदार खातेदारांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बीएचआरच्या नीरा शाखेतील सल्लागार मंडळाविरुद्ध कडक कारवाई करून संबंधितांना अटक करावी, अशी संबंधित ठेवीदारांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.
याबाबत जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील या पतसंस्थेच्या शाखेत ११ मार्च २०१४ रोजी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातील रहिवासी वामन यशवंत सुतार यांनी ३६५ दिवसांच्या मुदतीसाठी ५ लाख रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. एक वर्षाची मुदत संपल्यानंतर, मुदत ठेव पावती क्र.०७७९७९६ ही ठेवीची पावती घेऊन रक्कम घेण्यासाठी सुतार हे नीरा शाखेत गेले. त्या वेळी बीएचआर पतसंस्थेमधील संबंधितांनी बारामती आणि पुणे शाखेमध्ये घोटाळा झाल्याने शाखा बंद झाली असून, ठेवीची रक्कम परत देऊ शकत नाही, असे सांगितले. त्या वेळी बीएचआर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी, चेअरमन दिलीप कांतिलाल चोरडिया, व्हाइस चेअरमन मोतीलाल ओंकार जिरी या तिघांसह नीरा शाखेतील सल्लागार मंडळाने (संचालक) फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने, या पतसंस्थेच्या तिघा पदाधिकाऱ्यांसह नीरा शाखेतील सल्लागार मंडळाविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुतार यांच्यासह शहरातील आणि परिसरातील अनेक ठेवीदार आणि खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दरम्यान या पतसंस्थेत अनेक जणांच्या ठेवी अडकल्या असून, ठेवीदार हवालदिल झाले आहेत.(वार्ताहर)
या प्रकरणी बीएचआर संस्थेचे तिन्ही प्रमुख पदाधिकारी सध्या कोठडीत असल्याने, संबंधितांना न्यायालयाच्या परवानगीने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. ठेवीदार, खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या नीरा शाखेच्या सल्लागार मंडळाच्या संबंधिताना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेऊन, कडक कारवाई करणार
- रामदास शेळके,
पोलीस उपनिरीक्षक