देवरायांकडे दुर्लक्ष पर्यावरणासाठी घातक : डॉ. माणिक फाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:42 PM2018-06-06T12:42:46+5:302018-06-06T12:42:46+5:30
देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे.
दीपक कुलकर्णी
पुणे : देवाच्या नावाने जंगलाचा तुकडा राखून ठेवण्यामागे पर्यावरण रक्षणाचीच भूमिका होती. त्यातूनच देशात देवराया बहरल्या होत्या. परंतु, सध्या देवरायांकडे होणारे दुर्लक्ष पर्यावरणदृष्टया घातक असल्याचे मत देवराईच्या अभ्यासक डॉ. माणिक फाटक यांनी व्यक्त केले.
संपूर्ण भारतात आजच्या स्थितीला देवरायांचे गाढे अभ्यासक डॉ. के. पी. मल्होत्रा यांच्या मते जवळपास अंदाजे दीड लाख देवराई अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात दहा हजार आणि पुणे जिल्ह्यात एकूण तीनशे ते साडेतीनशे देवराई आहे. सावंतवाडी ते रत्नागिरी या परिसरात एकूण साडेआठशे तर वेल्हा आणि तोरणा गडाच्या पायथ्याशी तीस ते चाळीस देवराई उपलब्ध आहेत.
डॉ. फाटक म्हणाल्या, देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. गेली कित्येक वर्ष या देवराया फक्त वनस्पती शास्त्रापुरताच मर्यादित होत्या. परंतु, १९७० च्या दशकात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक व डॉ. माधव गाडगीळ यांनी देवराईंबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास सुरु केला. त्यासाठी त्यांनी १९८९ साली महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या माध्यमातून देवराईविषयीचे एक एक रहस्य समोर येऊ लागले. या देवरायांना प्रादेशिक प्रांत अथवा तिथल्या रहिवासी लोकांनी विविध नावे बहाल केली आहेत. उदा. कोकणात देवराहाटी, महाराष्टात देवराई, कर्नाटकात देवबन, राजस्थानमध्ये देवमाया यांसारख्या नावांचा त्यामध्ये समावेश आहे. या देवराईचे क्षेत्र एकाझाडापासून ते काही हेक्टर पर्यंत असू शकते. दापोली ते कुडाळ या परिसरातील एक देवराई तर १०० एकरपर्यंत पसरलेली आहे.
देवराई आणि नेहमीचे जंगल यातला फरक आपण जाणून घ्यायला हवा. ज्या भागात पाण्याचा स्त्रोत आहे. त्याच्या अवतीभोवती वसलेले जंंगल म्हणजे देवराई. आजूबाजूच्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली तर देवराईमधील बाराही महिने असलेला पाण्याचा स्त्रोत कामी आल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.
..............................
विविध ऋतुंमधील देवरायांचे लोभस रुप
ऋतुमानाप्रमाणे देवराईत आढळणारे पक्षी , प्राणी, वनस्पती, फुले हे वेगवेगळे आहे. त्यामुळे आपल्या सर्व ऋतुंमधील देवराईचे निरनिराळे रुप हे कमालीच्या उत्सुकतेचा भाग आहे. तसेच देवराईमधील खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास होणे आजदेखील बाकी आहे. त्यासाठी अभ्यासू व मार्गदर्शक यांच्यासह जास्तीत जास्त तरुणांनी पुढे यायला हवे. - डॉ. माणिक फाटक, देवराईच्या अभ्यासिका
......................
देवराईतली निसर्गसंपदा
देवराईत एरंड्या, राजा, भटक्या, काळी पाकोळी, चंचल पानपंखी, मलबारी अप्सरा, ही दुर्मिळ प्रजातीं सापडतात. तसेच आंब्याचा मोहोर, कुसर, वेलीची पांढरी सुवासिक फुले, आखराची निळी सुंदर फुले, सुकल्यावर लाल होणारी पापडखार, चांद्याची फुले, अशी विविध फुले लक्ष वेधून घेतात. देवरायांमध्ये असलेल्या कुंडे, पाणवठे यांत गप्पी, कोई, सोनेरी मासे असे मत्स्य वैभवाचे विविध प्रकार पाहायला मिळतात.