हेल्मेट कारवाईमुळे वाहतुकीचे अन्य गुन्हे दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:00 AM2019-05-29T06:00:00+5:302019-05-29T06:00:04+5:30
हेल्मेट न घातल्याच्या गुन्ह्याच्या दंड रकमेत वाढ होत असली तरी अन्य गुन्हे दाखल करून दंड करण्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे दिसत आहे.
पुणे : वाहतूक पोलिसांची हेल्मेट सक्तीची कारवाई जोरात सुरू असली तरी त्या नादात रस्त्यांवर होत असलेल्या वाहतुकीच्या अन्य गुन्ह्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सिग्नल तोडण्याच्या गंभीर गु्न्ह्यासह, एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर वाहन घुसवणे, ट्रिपल सिट बसणे असे प्रकार प्रमुख रस्त्यांवर होत आहेत. हेल्मेट न घातल्याच्या गुन्ह्याच्या दंड रकमेत वाढ होत असली तरी अन्य गुन्हे दाखल करून दंड करण्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे दिसत आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून पकडलेल्या वाहनधारकांवरच अन्य गुन्हेही नोंदवले जात आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर तरी वाहनचालकाने सर्वच नियमांचे पालन करून वाहन चालवणे अपेक्षित आहे. तसे कोणी करत नसेल तर लगेचच संबधितांना थांबवून त्यांना दंड करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. चौकांमध्ये सिग्नलच्या कडेलाच ते उभे असतात. मात्र सध्या त्यांच्याकडून हेल्मेट नाही याच कारणावरून कारवाई करणे सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहनचालकांचे, विशेषत: दुचाकीधारक वाहनचालकांचे वाहतूकीचे नियम मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या समोरून सिग्नल तोडून वाहनधारक जातात, मात्र हेल्मेट घातले नाही यासाठी पकडलेल्या वाहनधारकांबरोबर पोलिस हुज्जत घालण्यात मग्न असतात.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ट्रिपल सिट जाण्याचेही प्रमाण मोठे आहे. दिवसा व रात्रीही दहा पर्यंत रस्त्यावर वाहतूकीची कायम गर्दी असते. सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांमुळे अपघातही होतात. सिग्नल पाळला नाही म्हणून अपघात होतात याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
मध्य वस्तीत, उपनगरांमध्ये वाहतूकीची प्रचंड गर्दी दिवसा व रात्रीही असते. या सर्वच रस्त्यांवर प्रत्येक चौकात सिग्नल आहेत, झेब्रा क्रॉसिंग आहे, तसेच काही पर्यायी रस्ते एकरी वाहतूक म्हणून घोषीत केले आहेत. हे सगळे नियम पाळले गेले तर वाहतूक प्रवाही राहून अपघातांची शक्यताही कमी होते. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी किमान या रस्त्यांवर तरी वाहनचालकांना सगळे नियम पाळणे सक्तीचे करणे अपेक्षित आहे. तसे होतही होते, मात्र आता वाहतूक पोलिसांचे सगळे लक्ष हेल्मेट कारवाईचे व दंड वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करायचे याकडेच लागलेले दिसते आहे.
हेल्मेट सक्तीची कारवाई प्रामुख्याने कार्यालयीन येण्या-जाण्याच्या वेळांमध्येच पोलिस करतात. वाहनधारकाला जाण्याची घाई असल्यामुळे कसलीही चिडचिड न करता वाहनधारकाकडून लगेचच दंड दिला जातो. त्यामुळे या दोन वेळा पोलिसांनी फक्त हेल्मेट सक्तीच्या कारवाईच्याच बनवल्या आहेत. त्यानंतर दिवसभरात ही कारवाई होत नाही व वाहतूकीचे अन्य गुन्हे डोळ्यासमोर असताना तीही कारवाई होत नाही.
-----------------
कोणताही नियम तोडला तरी कारवाई
पोलिस फक्त हेल्मेट नाही घातले म्हणून कारवाई करत असतील तर ते चुकीचे आहे, मात्र तसे होत नाही. एखाद्या चौकात पोलिसांची संख्या कमी असेल तिथे हेल्मेटची कारवाई सुरू असताना सिग्नल मोडणाºयांकडे लक्ष न जाणे स्वाभाविक आहे. पोलिसांची संख्या व वाहनांची गर्दी व नियम चुकवण्याचे प्रमाण हे सगळेच आपल्याकडे व्यस्त आहे. तरीही आम्ही वाहतूक नियंत्रीत ठेवतो.
-पंकज देशमुख, वाहतूक पोलिस उपायुक्त.