एकही उमेदवार पसंत नाही; २०१९ ला पुण्यात ३ ठिकाणी 'नाेटा' तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:53 PM2024-11-13T15:53:39+5:302024-11-13T15:54:45+5:30
मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारा कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर 'नोटा' हा पर्याय निवडतात
नितीन चौधरी
पुणे : निवडणूक रिंगणात उभा असलेल्यांपैकी एकही उमेदवार पसंतीचा नसेल, तर उमेदवारांनी काय करावे? यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवार पसंतीचा नसल्याचा अर्थात नोटा (नन ऑफ द अबाऊ) म्हणजेच ‘वरीलपैकी एकही नाही’ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही सुविधा २०१४ पासून मिळत आहे. हा पर्याय उपलब्ध हाेताच, पहिल्याच निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी नोटाला सातव्या, आठव्या क्रमांकाची मते मिळाली हाेती. याच निवडणुकीत सर्वाधिक ४ हजार ४३५ मते पिंपरी मतदारसंघात मिळाली होती. विशेष म्हणजे, सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला ३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची; तर ७ मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची मते मिळाली हाेती.
पिंपरी, दाैंड येथे विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नाेटाला अधिक मते
पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघात २०१४ मध्ये विजयी उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती, तर २०१९ मध्ये दौंड मतदारसंघात विजयी उमेदवार राहुल कुल यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाेटाला सर्वाधिक मते चिंचवड मतदारसंघात मिळाली. ही मते एकूण मतदानाच्या तब्बल २.११ टक्के अर्थात, ५ हजार ८७४ इतकी होती. याच निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातही एकूण मतदानाच्या २ टक्के अर्थात, ४ हजार २८ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.
पहिल्याच निवडणुकीत पिंपरीत ४,४३५ मते
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ च्या निर्णयानंतर २०१४ पासून केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये याचा प्रभाव दिसून आला. या मतदारसंघात शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांचा २,३३५ मतांनी पराभव केला होता. मात्र, या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतदारांनी अर्थात, ४ हजार ४३५ जणांनी नोटाला पसंती दिली हाेती. नोटाला मिळालेली ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर, चिंचवड मतदारसंघात ३ हजार २०३ मते नोटाला मिळाली. सर्वात कमी म्हणजे, ४३७ मते नाेटाला इंदापूर मतदारसंघात मिळाली होती.
जुन्नरमध्ये वंचितपेक्षा जास्त मते
भोर व आंबेगाव मतदारसंघात नाेटाला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे, आंबेगाव, खेड आळंदी, पुरंदर, भोर, मावळ, पिंपरी, कोथरूड, पर्वती या ८ मतदारसंघांत बहुजन समाज पक्ष या राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली होती. इंदापूर मतदारसंघात स्वतंत्र भारत पक्षापेक्षा जास्त मते मिळाली. जुन्नर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीपेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली होती.
दाैंडला लीड ७४६ मतांचे; तर नाेटाला मिळाली ९१७ मते
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना उमेदवार पसंतीचा मिळाला नसल्याने नोटाचा प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील २१ पैकी तब्बल तीन मतदारसंघांत नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. यावरून नागरिकांमधील रोषही दिसून येतो. यात आंबेगाव, चिंचवड व कोथरूड मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५,८७४ मते चिंचवड मतदारसंघात नोटाला मिळाली होती. त्या खालोखाल ४,०२८ मते कोथरूडमध्ये; तर ३,६६८ मते पर्वती मतदारसंघात नाेटाला मिळाली हाेती. याच निवडणुकीत दौंड मतदारसंघात भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा केवळ ७४६ मतांनी पराभव केला होता. नाेटाला ९१७ मते मिळाल्याने विजयी उमेदवाराच्या फरकापेक्षा ही मते जास्त होती.
१७ मतदारसंघात राष्ट्रीय पक्षापेक्षा नाेटाला पसंती
जिल्ह्यात २०१९ मध्येच नोटाला बारामती, पुंरदर, मावळ, पिंपरी, भोसरी, खडकवासला आणि पर्वती या ७ मतदारसंघांमध्ये चौथ्या क्रमांकाची मते नाेटाला मिळाली होती. जुन्नर, खेड आळंदी, शिरूर, दौंड, वडगावशेरी, शिवाजीनगर व कसबा पेठ मतदारसंघात पाचव्या; तर इंदापूर, हडपसर व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सहाव्या क्रमांकाची मते मिळाली होती. नोटाला मिळालेली ही पसंती बहुजन समाज पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त असल्याचे चित्र जुन्नर, खेड आळंदी, आंबेगाव, शिरूर, बारामती, पुरंदर, मावळ, चिंचवड, पिंपरी, वडगावशेरी, भोसरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला या मतदारसंघात पाहायला मिळाले. कोथरूड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीपेक्षा जास्त, तर पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर व वडगाव शेरी मतदारसंघात आम आदमी पक्षापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली आहेत.
मागील दाेन निवडणुकीतील चित्र
सन २०१४ च्या निवडणुकीत नाेटाला पिंपरी मतदारसंघात एकूण मतदानाच्या २.५१ टक्के अर्थात ४ हजार ४३५ मते मिळाली होती. ही सर्वाधिक टक्केवारी ठरली आहे. त्या खालोखाल पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात १.३२ टक्के (१८९८) तर शिवाजीनगरमध्ये १.२४ टक्के (१८४२) मतदारांनी नाेटाला पसंती दिली होती. सन २०१९ मध्येही नाेटाला एकूण मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिंचवड मतदारसंघात एकूण मतदानाच्या २.११ टक्के अर्थात ५ हजार ८७४, तर कोथरूड मतदारसंघात २.०६ टक्के (४०२८) व पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १.८९ टक्के (२३८८) मते मिळाली आहेत.
कसब्याच्या पोटनिवडणुकीतही तिसऱ्या क्रमांकावर नाेटा
कसबा पेठ मतदारसंघात २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत नोटाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थात १४०१ मते, तर चिंचवडमध्ये पाेटनिवडणुकीत चौथ्या क्रमांकाची अर्थात २७३१ मते नाेटाला मिळाली होती.
नोटाचा पर्याय का?
मतदान हा प्रत्येकाचा महत्त्वाचा हक्क आणि अधिकार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या या अधिकाराचा वापर केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला निवडणुकीत उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटा हा पर्याय वापरू शकता. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) निवडणुकीत उभा असलेला उमेदवार आणि त्याचा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अशी यादी दिलेली असते. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान केले जाते. मात्र, यंत्रावरील उमेदवारांच्या यादीच्या तळाशी ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच नोटा, असे लिहिलेले एक पर्याय देखील आहे. मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारा कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मतदार नोटा हा पर्याय निवडू शकतो. याद्वारे मतदारांना सर्व उपलब्ध उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळतो.
मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेली मते :
मतदारसंघ - २०१४ ची निवडणूक - २०१९ ची निवडणूक
जुन्नर १,७५६ १,४९२
आंबेगाव १,३०० १,६१६
खेड-आळंदी १,१०६ १,७०७
शिरुर १,३४९ १,८२७
दौंड १,४६४ ९१७
इंदापूर ४३७ ७३१
बारामती १,५६२ १,५७९
पुरंदर १,२०८ १,८०८
भोर १,७०४ १,८२७
मावळ २,००६ १,४९०
चिंचवड २,२०२ ५,८७४
पिंपरी ४,४३५ ३,२४६
भोसरी १,३६८ ३,६३६
वडगावशेरी १,७५४ २,४१८
शिवाजीनगर १,८४२ २,३९०
कोथरुड १,५८३ ४,०२८
खडकवासला २,१०८ ३,५६१
पर्वती १,७७४ ३,६६८
हडपसर १,६१० २,४७४
पुणे कॅन्टोन्मेंट १,८१८ २,३८८
कसबा पेठ १,३७१ २,५३२