ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

By सायली जोशी-पटवर्धन | Published: February 9, 2023 10:59 AM2023-02-09T10:59:54+5:302023-02-09T11:00:16+5:30

घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

Neither Muhurta nor Saptapadi; God's Alandi is becoming a wedding hub | ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

googlenewsNext

सायली जोशी-पटवर्धन / भानुदास पराड -

पुणे : लग्न लावून देणाऱ्या एजंटला ५ ते १० हजार रुपये द्यायचे, तासाभराचा विधी करायचा आणि ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने राहायचा निश्चय करायचा, इतकी सोपी ही प्रक्रिया. म्हणूनच देवाची आळंदी अशी जगभरात ओळख असलेल्या या शहराची आता ‘लग्नाचे हब’ अशी नवी ओळख बनली आहे. यात लग्न इंटरकास्ट असो की दुसरे-तिसरे, कमीत कमी खर्चात झटपट लग्न लावून देण्यासाठीची यंत्रणा आळंदीत कार्यरत आहे.

एकीकडे ज्ञानेश्वर माउलींचा गजर, तर दुसरीकडे पावलोपावली मंगल कार्यालये, धर्मशाळा आणि लग्न लावून देणाऱ्या एजंटची कार्यालये. येथे गुरुजी पाहावा लागत नाही ना फोटोग्राफर. लग्न करण्यासाठी अगदी अक्कलकोट, पालघर, मुंबई, औरंगाबाद असे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जोडपी येतात.

अनेक जाेडपी पळून आलेली 
घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे लग्नासाठी  मागतो. रीतसर लग्न झाल्यावर जोडप्याला प्रमाणपत्र देतो. परिस्थिती नसेल तर पैसे न घेताही लग्न लावून देतो.
- युवराज ढाके, प्रमुख, मंगल संस्था

मी दोन वर्षांपूर्वी बीडहून आलो. आता अशी लग्न लावण्याबरोबरच वास्तुशांती, उदक शांत, पूजा-पाठ अशी कामे करतो. सुरुवातीला आम्ही एक साखरपुडा विधी करतो. पाहुणे, कपडे बदला-बदली, वाजंत्री असे काहीच नसल्याने हे सगळे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात होते. मुहूर्तही पाहिला जात नाही. दिवसाला साधारण ४ ते ५ लग्न लावतो.
- एक गुरुजी (नाव न छापण्याच्या अटीवर)

आळंदीत लहान-मोठी मिळून एकूण १५० कार्यालये आहेत, तर ५०० धर्मशाळा आहेत. दिवसाला साधारण १०० ते १५० लग्न होतात. दिवसेंदिवस लग्नाचे प्रमाण वाढत आहे.
- ज्ञानेश्वर वीर, प्रमुख व्यवस्थापक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी

Web Title: Neither Muhurta nor Saptapadi; God's Alandi is becoming a wedding hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.